ठिबक सिंचन, सौर कृषिपंपांबाबतची तरतूद स्वागतार्ह ः कृषीक्षेत्रातील तज्ज्ञ

विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार
विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार

पुणे ः अर्थसंकल्पात ठिबक सिंचन, सौर कृषिपंपांबाबतची तरतूद स्वागतार्ह आहे.  कोकणातील काजू प्रकल्पास १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद; तसेच गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन या बाबीदेखील महत्त्वपूर्ण आहेत. मात्र कृषी शिक्षण, विस्तारासाठी भरीव तरतूद गरजेची होती, अशा प्रतिक्रिया कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.   शेती प्रश्‍न सोडविण्यासाठी योग्य अर्थसंकल्प यंदाचा, अर्थसंकल्प हा वास्तव आर्थिक परिस्थितीला सुसंगत आहे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घेतलेले निर्णय हे व्यवहाराला धरून आहे. यात राजकीय स्टंट वाटत नाही. सौर ऊर्जा पंप वापरण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. सिंचन व्यवस्थेकडे अधिक चांगले लक्ष दिले आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे. यामुळे शेतीचा प्रश्न सुटला की रोजगारासाठी बराचसा प्रश्न सुटू शकतो. तरुणांना रोजगार देण्यासाठी शिकाऊ उमेदवारांची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे. - जे. एफ. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर.

ठिबक सिंचनाचा निर्णय स्वागतार्ह  उसाचे संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी घेतलेला निर्णय कृषीक्षेत्रावर अनुकूल परिणाम करणारा ठरणार आहे. मराठवाड्यात उदभवणाऱ्या दुष्काळामुळे एकवेळ ऊस लागवड बंद करण्याची स्थिती निर्माण झाली होती. अशावेळी सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे पाण्याचा काटेकोर वापर होऊन उत्पादनात वाढ होईल. शिवाय पाण्याची बचत होऊन कमी पाण्यावर येणाऱ्या तूर, हरभरा आदी पिकांनाही त्याचा उपयोग होईल. कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौरपंप योजनेंतर्गत भरीव तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी ते दिलासादायक आहे. कृषी कौशल्य विकास कार्यक्रम कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत राबविता येईल. त्यातून ग्रामीण भागातील गरजू बेरोजगार युवक प्रशिक्षित होतील. रोजगारनिर्मिती होईल. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील अनेक निर्णय स्वागतार्ह आहेत. डॅा. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.

ठिबक सिंचन, सौर कृषिपंप योजना दिशादर्शक यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी २२ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत म्हणून देण्यात येणार आहे; तसेच पायाभूत सुविधांसाठी २ लाख ४८ हजार कोटी आणि भूजल पातळीत वाढ करण्यासाठी १० हजार ३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ही चांगली बाब आहे. सौर कृषिपंप योजनेसाठी ६७० कोटी रुपयांची तरतूद; ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी अल्पभुधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे वीज आणि पाणीबचतीच्या दृष्टीने आशादायी बाब आहे.   कोकणातील काजू प्रकल्पास १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद; तसेच गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन, समृद्धी महामार्गावर कृषी समृद्ध केंद्रांची उभारणी फायदेशीर ठरू शकेल. मात्र कृषी संशोधन, कृषी शिक्षण आणि विस्तारासाठी भरीव तरतुदीची गरज होती.  - डॉ. डी. बी. यादव विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

कृषी विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प शेती शाश्वत तर शेतकरी सुखी आणि शेतकरी समाधानी तर राज्य आणि देश प्रगत हे समीकरण प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी सामूहिक प्रयत्न कालसुसंगत आहेत. भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच सौरपंप योजनेसह दिवसा अखंडित वीज पुरवठा, सूक्ष्म सिंचन पद्धतीला अधिक प्रोत्साहन व अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी भरीव निधी,  ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, पीकविम्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतमाल उत्पादना सोबतच विक्रीसाठी प्रोत्साहन मिळेल. ग्रामीण व शहरी रस्ते निर्मितीचे धोरण विकासाकडे नेणारे ठरणार आहे. एकूण अर्थसंकल्प निश्चितच आशादायक आहे. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

मत्स्यशेती, ठिबक सिंचनासाठी योग्य निर्णय अल्पभूधारक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्व पिकांसाठी ८० टक्के अनुदानाची ठिबक सिंचन योजना फायदेशीर ठरणारी आहे. कोकणातील कमी क्षेत्र असणाऱ्या आंबा, काजू उत्पादकांना याचा फायदा होईल. भूजल संधारणासाठी दिलेले प्राधान्यदेखील महत्त्वाचे आहे. कोकणपट्टीतील पडीक खारजमिनीचा विचार करून मत्स्यशेती, कोळंबी शेतीला प्राधान्यक्रम दिलेला आहे. त्यांचा निश्चितपणे फायदा पूरक उद्योगांना होईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेली तरतूद योग्य आहे.  - डॉ. एस. डी. सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com