बुलडाण्यात २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडे कापूस पडून

बुलडाणा ः यंदा असंख्य अडचणींना सामोरा जात असलेल्या कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विक्री करतानाही समस्यांमध्येच अडकलेला आहे. आगामी हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्ह्यात अद्यापही २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडील कापसाची विक्री व्हायची शिल्लक आहे. या हंगामात सर्व खऱेदीदार मिळून २१.८८ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः यंदा असंख्य अडचणींना सामोरा जात असलेल्या कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विक्री करतानाही समस्यांमध्येच अडकलेला आहे. आगामी हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्ह्यात अद्यापही २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडील कापसाची विक्री व्हायची शिल्लक आहे. या हंगामात सर्व खऱेदीदार मिळून २१.८८ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

कोरोनाचे संकट उदभवण्यापुर्वी जिल्‍ह्यात ६५ हजारांवर शेतकऱ्यांचा २० लाख ४९ हजार क्विंटल कापूस विक्री झाला होता. ‘कोरोना’मुळे लॉकडाउन सुरु होताच कापूस खरेदीत मोठी घट झाली. या काळात २१ मेपर्यंत ५७७७ शेतकऱ्यांचा १.३८ लाख क्विंटल कापूस खरेदी होऊ शकला. यात कापूस पणन महासंघ, सीसीआय तसेच व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीचा समावेश आहे.

जिल्ह्यात कापसाचे लागवड क्षेत्र २ लाख १३ हजार हेक्टरपर्यंत पोचले होते. यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीतील कापूस अधिक होता. परतीचा पाऊस झाल्याने या कोरडवाहू कापूस पिकाला फायदा झाला होता. परिणामी उत्पादन चांगले झाले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा खरेदीचा आकडा सुमारे २२ लाख क्विंटलपर्यंत पोचला. लॉकडाउनची परिस्थिती नसती तर कापसाची बहुतांश खरेदी पुर्णत्वास आली असती.

परंतु लॉकडाउनच्या काळात बहुतांश खरेदी केंद्रे व खासगी व्यापाऱ्यांची खरेदी ठप्प झाली आहे. याच महिन्यात खरेदीची प्रक्रिया सुरु झाली. या काळात २९ हजार ५२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २६ हजार ७४८ शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदी व्हायचा आहे. पावसाचे दिवस जवळ आलेले असून कापूस विक्री व्हावा यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरु आहे. कापूस विक्री केंद्रांवरून मेसेज येण्याची शेतकरी चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत थांबलेले आहेत.

नॉन एफएक्युचा प्रश्‍न सुटलाच नाही शासकीय खरेदी केंद्रांवर केवळ एफएक्यु दर्जाचा कापूस खरेदी केला जात आहे. यंदा अति पावसामुळे कापूस उत्पादनाचा दर्जा खालावला होता. पहिल्या दोन ते तीन वेचण्यांचा कापूस केवळ एफएक्यु दर्जाचा आला होता. त्यानंतर प्रत्येक वेचणीच्या कापसात कवडीचे प्रमाण वाढत गेले. एकूण कापसापैकी ७० टक्के कापसाचा दर्जा नॉन एफएक्यु आलेला आहे. हा कापूस शासकीय केंद्रावर विक्री न झाल्याने सर्वच शेतकऱ्यांना वेगळा पर्याय शोधण्याची वेळ आलेली आहे. शासनाने विविध ग्रेड पाडून संपूर्ण कापूस खरेदी करावा अशी सातत्याने मागणी होऊनही कुणीच त्यावर तोडगा काढला नाही.

जिल्हयात आजवर झालेली खरेदी
खरेदीदार शेतकरी संख्या कापूस खरेदी (क्विंटल)
पणन महासंघ ६९८५ २ लाख ६४ हजार ३८०
सीसीआय ३३,८६५ १० लाख २२ हजार ६१८
खासगी बाजार समिती १८,८२५ ३ लाख ७९ हजार १३
व्यापारी १०,४८३ ५ लाख २२ हजार २२३
एकूण ७०,१५८ २१ लाख ८८ हजार २३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com