शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा  ः शेताजवळ बांधण्यात आलेला निकृष्ट बंधारा फुटून पिकाचे नुकसान झाले. त्यापोटी भरपाईची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष करून त्यास भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. याविरोधात तब्बल ९ वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या या शेतकऱ्याला तब्बल ८० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश भंडारा दिवाणी न्यायालयाने दिले आहेत.

पवनी तालुक्‍यातील कोटूर्ली येथील रहिवासी खेमचंद हटवार यांची कोटूर्ली शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतालगत २०१०-११ मध्ये कृषी विभागाच्या निधीतून बंधारा बांधण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा बंधारा फुटला. त्यामुळे साठविलेले पाणी खेमचंद हटवार यांच्या शेतात शिरून त्यांच्या धानपिकाचे नुकसान झाले. खेमचंद व सुलोचना हटवार यांचे सलग दोन वर्षे धानपिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. पवनी तहसीलदार, पवनी तालुका कृषी अधिकारी; तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मदतीचा प्रस्ताव त्यांनी दाखल केला होता.

कोणत्याच पातळीवर दखल घेतली जात नाही, असे लक्षात आलेल्या खेमचंद हटवार यांनी अखेरीस भंडारा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायाधीश डी. जे. खंडाईत यांनी खेमचंद व सुलोचना हटवार यांचा हा दावा मंजूर करीत पवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना भरपाईचे आदेश दिले. तब्बल नऊ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर न्याय मिळाल्याने शेतकरी खेमचंद यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. पवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून त्यांना ८० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या संदर्भाने पवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com