नाशिक जिल्ह्यात साकारलेय ‘फ्लॉवर पार्क’

नाशिक जिल्ह्यातील फ्लाॅवर पार्कमधील प्रतिकृती
नाशिक जिल्ह्यातील फ्लाॅवर पार्कमधील प्रतिकृती

नाशिक  ः येथील उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरीजवळ आठ एकर क्षेत्रावर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. येथील अनुकूल हवामान या फुलांसाठी फायदेशीर ठरले आहे. 

जागतिक स्तरावर दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. कल्पकता, संशोधन व स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून हे उद्यान साकारले आहे. यासाठी शशिकांत जाधव यांच्यासह प्रयोगशील शेतकरी गोकूळ पाटील व आर्किटेक्ट निधी पाटील यांनी योगदान दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सामूहिक कल्पकतेतून या फ्लॉवर पार्क उभारणीसाठी काम सुरू होते. टाकाऊ घटकांचा अधिक वापर करून येथे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली आहे. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश आहे. या फुलांचा व विविध वेलींचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या पार्कमध्ये १२८ प्रकारची विविध फुले आहेत. फ्लॉवर पार्कमध्ये लाल माती, कोकोपीट व खतांच्या मिश्रणाचा वापर करून विशिष्ट आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात संपूर्णपणे सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. 

विविध जातींच्या रंगीबेरंगी फुलांचा समावेश विविध जातींच्या, रंगांच्या शोभिवंत फुलझाडांची या पार्कमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पिटोनियाची २० रंगांची रोपे, झेनियाची ९ रंगांची तर डायनथसच्या ८० रंगांच्या रोपांचा समावेश आहे. या झाडांचे जीवनमान ५ महिन्यांचे असल्याने फ्लॉवर पार्कमध्ये ही फुलझाडे मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com