यवतमाळमध्ये खरिपासाठी २४.५१ टक्केच पीककर्ज वितरण

यावर्षी लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्यासमोर पीककर्जाच्या उपलब्धतेचाही प्रश्‍न नव्याने निर्माण झाला आहे. बॅंकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांचे दार ठोठवावे लागणार आहेत. - मनीष जाधव, वागद, जि. यवतमाळ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळमध्ये बॅंकांनी खरीप पीककर्ज वाटपात मेअखेरपर्यंत ५३४ कोटी ९२ लाखांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्याला यावर्षी २ हजार १८२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. या तुलनेत केवळ २४.५१ टक्‍केच कर्ज वितरण झाल्याने उद्दिष्टपूर्ती अशक्‍य मानली जात आहे.

मे महिन्यात पहिल्या पंधरवड्यापर्यंत १२० कोटी ६४ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा बॅंकेने आघाडी घेतली होती. जिल्हा बॅंकेला ५४८ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मे अखेरपर्यंत २१६ कोटींचे कर्ज वितरण या बॅंकेने करून कर्ज वाटपात आघाडी घेतली. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना १३७० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

परंतु या बॅंकांकडून कर्ज वितरण अपेक्षित गतीने सुरु नाही. आजवर ८ ते ११ टक्‍केच पीककर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून झाले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज वितरणात पिछाडीवर असल्याची स्थिती आहे. २०१९-२० या वर्षात ५ मेपर्यंत १०५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. गेल्यावर्षी खरिपाकरिता २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५५३ कोटी रुपये म्हणजे ६३ टक्‍के पीककर्ज वाटप झाले होते.

भाजप सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली होती. दीड लाखापर्यंतची कर्जमाफी हवी असल्यास त्यावरील रक्‍कम भरण्याचे सांगण्यात आले होते. या योजनेच्या लाभापासून जिल्हा बॅंकेचे ३० हजार शेतकरी अद्यापही वंचित आहेत.    जिल्ह्यात बॅंकेच्या २६६ शाखा आहेत. त्यांच्या माध्यमातून पीककर्ज वितरणाला गती देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे बॅंकांपर्यंत पोचणे, पीककर्जासाठी स्टॅम्पपेपर घेणे अशा काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. येत्या काळात कर्ज वितरणाला गती येण्याची शक्‍यता असल्याचे अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर टापरे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com