तीन जिल्ह्यांतील ४८९१ हेक्‍टर क्षेत्राला ‘अवकाळी’चा फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जालना   : अवकाळी पावसासह गारपिटीने औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील जवळपास ४८९१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या क्षेत्रातील गहू, ज्वारी, हरभरा, मका, मोसंबी, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले होते. परंतू पंचनाम्याचे आदेश नसल्यामुळे नुकसानीचे नेमके प्रमाण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पंचनाम्याच्या आदेशाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासह परभणी जिल्ह्यात काही प्रमाणात अवकाळी पाउस तर काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान झाल्यानंतर काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी आहेत. पंचनाम्यासंदर्भात महसूल विभागाकडून अजून आदेशच नसल्याने पंचनाम्याची प्रक्रिया कुठेही सुरू नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी या दोन तालुक्‍यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने ८५६ हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाले. त्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या ५०४ हेक्‍टरसह गारपिटीमुळे बाधित झालेल्या ३५२ हेक्‍टरवरील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा तसेच मोसंबी या फळपिकांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, औरंगाबाद, कन्नड व पैठण तालुक्‍यात अवकाळी पावसासह आलेल्या वादळामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका आदी पिकांसह द्राक्ष व मोसंबी या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास २२७ हेक्‍टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी, वडवणी या दोन तालुक्‍यांत जवळपास २२०० हेक्‍टरवरील रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, मका, हरभरा, कांदा या पिकांसह संत्रा पिकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com