सोलापुरातील ८४२ हेक्टर क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जवळपास १ हजार ३५ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, आंबा, हरभरा, गहू, ज्वारी, मका, कलिंगड, केळी, चिकू आदी पिकांचा नुकसानीमध्ये समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा अहवाल तयार केला असून, शासनाकडे तो पाठविला आहे.

गेल्या आठवड्यात २९ फेब्रुवारीला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मार्चला असे सलग दोन दिवस जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतात काढणीस आलेली ज्वारी, गहू भिजवून टाकला. हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष, डाळिंबालाही तडाखा दिला. त्यानंतर या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. आता यासंबंधीचा अहवाल तयार केला आहे. पण, त्यात कोणत्या पिकाचे किती रुपयांचे नुकसान झाले, याचा उल्लेख नाही. मात्र, नुकसानीचा उल्लेख आहे. २९ फेब्रुवारीला उत्तर सोलापुरातील पाच गावांतील सात शेतकऱ्यांच्या द्राक्ष, आंबा बागेचे सात हेक्टरचे नुकसान झाले आहे. याच दिवशी माढा तालुक्यातील सहा गावांतील २० शेतकऱ्यांचे १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

एक मार्चला झालेल्या अवकाळीमुळे बार्शी तालुक्यातील दोन गावांतील चार शेतकऱ्यांचे दोन हेक्टर, दक्षिण सोलापुरातील आठ गावांतील २८१ हेक्टर शेतकऱ्यांचे २६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय, अक्कलकोट तालुक्यातील एका गावातील नऊ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील पाच गावांतील ५० हेक्टर, मोहोळ तालुक्यातील २६ गावांतील १३७ हेक्टर, मंगळवेढ्यातील २९ गावांतील २९५ हेक्टर, सांगोल्यातील दीड एकर, माळशिरस तालुक्यात ५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील ८७ गावांतील एक हजार ३५ शेतकऱ्यांचे ८४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद आहे.

मदतीबाबत उदासीनता शासनाकडून गतवर्षी अतिपावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही अनेक तालुक्यांत मिळालेली नाही. त्यात आता पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. आता पुन्हा पंचनामे होऊन प्राथमिक अहवाल तयार झाला. पण, आधीचीच मदत हातात न मिळाल्याने आता पुन्हा या मदतीची अपेक्षा करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तशी उदासीनताच दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com