डॉ. साबळे यांनी विकसित केले स्फुरदयुक्त खतनिर्मिती तंत्रज्ञान  

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी संशोधन व प्रयोगांच्या आधारे स्फुरदाचे प्रमाण अधिक असलेल्या खतनिर्मितीचे (फॉस्फोमॅन्यूअर) तंत्रज्ञान विकसित केले आहे. मागील वर्षी मेमध्ये या तंत्रज्ञानाच्या पेटंटचे नोंदणीकरणही करण्यात आले आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबरच रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा डॉ. साबळे यांनी केला आहे. 

ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मॉन्सून मॉडेलचे यापूर्वीच पेटंट नोंदणीकरण झाले आहे. यापुढील टप्प्यातील संशोधनांतर्गत डॉ. साबळे यांनी स्फुरदाचे अधिक प्रमाण असलेल्या खतनिर्मितीचे तंत्रज्ञान (फॉस्फोमॅन्युअर) विकसित केले आहे. ‘स्फुरदयुक्त खतनिर्मितीचे साबळे तंत्रज्ञान’ (साबळे मेथड ऑफ फॉस्फोमॅन्युअर) या नावाने त्याच्या पेटंटसाठी १० मे २०१९ रोजी नोंदणीकरण झाले आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबरच रासायनिक खतांचा वापर आणि खर्च कमी करणे हा या खतनिर्मितीमागील हेतू असल्याचे डॉ. साबळे यांनी म्हटले आहे. 

स्फुरद भरपूर असलेले खत  या ‘फॉस्फोमॅन्युअर’मध्ये स्फुरदाचे प्रमाण प्रति टनामागे ७० किलो, नत्राचे २० किलो तर पोटॅशचे प्रमाण १६ टक्के आहे. याशिवाय दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्येही या खतात भरपूर प्रमाणात आहेत. सन १९९१ ते २०१० या काळात संशोधन व त्याचबरोबर पुणे येथील कृषी महाविद्यालय व शेतकऱ्यांच्या शेतात या खताच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. ज्वारी, हरभरा, मेथी, तूर, कोथिंबीर आदी पिकांत त्याचे प्रयोग घेण्यात आले. या खताच्या निर्मितीमध्ये रॉक फॉस्फेट, आयर्न पायराईटस, स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांचा वापर झाला आहे. रॉक फॉस्फेटवर प्रक्रिया करण्यासाठी आयर्न पायराईटस किंवा जिप्समचा वापर करणे या तंत्रात शक्य असल्याचे डॉ. साबळे यांचे म्हणणे आहे. एकमेकांवर विशिष्ट थर लावून व स्लरीचा वापर करून सुमारे ३५ दिवसांत या खताची निर्मिती होते, असे ते म्हणाले.    

डॉ. साबळे म्हणाले, की या खताचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास फर्टिलायझर्स कंट्रोल ॲक्टमध्ये त्याचा समावेश करण्याची प्रक्रिया संबंधितांनी करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठीही त्याचा वापर करावयाचा असल्यास सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थेकडून त्यासंबंधीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

विविध प्रकारांत खत  शेणखत, कंपोस्ट, शहरी कंपोस्ट, पोल्ट्रीखत, प्रेसमड, गांडूळखत अशा विविध प्रकांरात ‘फॉस्फोमॅन्युअर’ तयार करण्यात येऊ शकते. एक टन खतनिर्मितीसाठी रॉक फॉस्फेट, जिवाणू खते, आयर्न पायराइट्‌स, मजुरी व पॅकिंग असा एकूण खर्च सुमारे ९०० ते एकहजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. जस्टस लायबीग या जर्मन शास्त्रज्ञाने वनस्पतींच्या वाढीसाठी स्फुरद हे अन्नद्रव्य मूलस्थानी असल्याचे सांगितले आहे. त्यादृष्टीने हे खत शेतकरी तसेच शहरांतील कचरा नष्ट करण्याच्या दृष्टीनेही होणाऱ्या प्रकल्पांसाठीही महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com