सरिता पर्पल, नानासाहेब पर्पल द्राक्ष वाणांना स्वामित्व हक्क

सरिता पर्पल, नानासाहेब पर्पल द्राक्ष वाण
सरिता पर्पल, नानासाहेब पर्पल द्राक्ष वाण

सोलापूर  ः नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी आणि कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी सोनाका, शरद सीडलेस हे वाण विकसित करण्याच्या साखळीनंतर आता निवड पद्धतीने विकसित केलेल्या सरिता पर्पल सीडलेस आणि नानासाहेब पर्पल सीडलेस या दोन वाणांना राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून स्वामित्व हक्क नोंदणी प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यामुळे या दोन्ही वाणांचे हक्क श्री. काळे यांच्याकडे असणार आहेत. द्राक्षामध्ये एकाचवेळी दोन वाणांसाठी स्वामित्व हक्क मिळवणारे श्री. काळे पहिलेच शेतकरी ठरले आहेत. 

श्री. काळे यांनी बुधवारी (ता. १) येथे पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष आशिष काळे, प्रगतिशील बागायतदार सुनील कत्ते, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. काळे म्हणाले, की आमचे वडील नानासाहेब काळे यांनी १९८० मध्ये थॉमसन सीडलेसमधून सोनाका आणि त्यानंतर १९९० मध्ये शरद सीडलेस या जाती शोधल्या. त्यांच्यानंतर त्याच निरीक्षण दृष्टीने मी अभ्यास केला. त्यानंतर मीही २००४ मध्ये सरिता पर्पल सीडलेस आणि नानासाहेब पर्पल सीडलेस हे दोन वाण विकसित केले. शरद आणि सोनाका या मातृवृक्षांच्या आधारेच हे दोन्ही वाण नव्या वैशिष्ट्यांसह विकसित केले. जांभळा रंग, आकाराने मोठी, लिचीसारखी चव, कुरकुरीतपणा, १० ते १२ ग्रॅम वजन असणारी आणि निर्यातीतही उत्तम मागणी असणारी ही दोन्ही वाणे आहेत. 

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे तत्कालीन प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांच्या साहाय्याने २०१५ मध्ये राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे या वाणाच्या नोंदणीसाठी अर्ज केला. कृषी विज्ञान केंद्रानेही त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. प्राधिकरणाकडून त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. त्यात मातृवृक्ष, पाने, फुले, लागवड पद्धत खते-पाणी व्यवस्थापन, उत्पादन तंत्र, फळाची साल, गर, चव, फळातील साखरेचे प्रमाण यांसारख्या नोंदी तपासल्या. अन्य वाणांपेक्षा सरिता आणि नानासाहेब पर्पलमध्ये असलेली वैशिष्ट्ये, वेगळेपण, शाश्‍वत उत्पादन याच्या नोंदीची दखल घेऊन हे प्रमाणपत्र मिळाले. या कामात डॉ. सावंत यांच्यासह डॉ. रोशनी, डॉ. रवी प्रकाश, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. तांबडे यांचे सहकार्य मिळाल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. 

परवानगीशिवाय रोपविक्री नाही या स्वामित्व हक्‍क प्रमाणपत्रामुळे श्री. काळे यांच्या परवानगीशिवाय सरिता पर्पल आणि नानासाहेब पर्पल या दोन्ही वाणांच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण आयात, निर्यात कोणालाही परस्पर करता येणार नाही. असे केल्यास कायद्याच्या कलम ७२ अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे काळे यांची परवानगी या वाणासाठी आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com