लाॅकडाउनमुळे नाशिकमधील शेतकऱ्यांचे १० कोटींवर नुकसान होण्याची शक्यता 

अगोदर खरबूज पुण्याला पाठवले. आता डाळिंब काढणीसाठी आले असताना लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीमाल हा नाशवंत असल्याने त्याच्या विक्रीसाठी नियम शिथिल करावेत. - राजेंद्र हिरे,फलोत्पादक, आघार बु.,ता.मालेगाव, जि. नाशिक.
तोडणीनंतर शेतीमाल बाजारात नेण्याची तयारी सुरू होती. मात्र उठाव नसल्याचे अडचणी वाढल्या आहेत.
तोडणीनंतर शेतीमाल बाजारात नेण्याची तयारी सुरू होती. मात्र उठाव नसल्याचे अडचणी वाढल्या आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी वाशी व सुरत मार्केट या प्रमुख बाजारपेठा आहेत. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मार्चअखेर लॉकडाउन झाल्यानंतर शेतकऱ्यांना भाजीपाला विकता आला नाही. त्यानंतर बाजारात वाहनांची मर्यादा आल्याने नियोजन करून पुणे शहरात शेतीमाल पाठवायला सुरुवात झाली होती. मात्र आता पुणे शहरात पुन्हा लॉकडाउन झाल्याने तेथे भाजीपाला विक्रीचा पर्याय पुन्हा बंद झाला आहे. नाशिकमधील स्थानिक बाजारांमध्ये फारशी मागणी नाही त्यामुळे कसमादे पट्ट्य़ातील शेतकऱ्यांना भाजीपाल्यास उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळणे अवघड असल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे १० कोटींवर नुकसान होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातून वाशी (मुंबई) आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जातो. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाशी बाजार समिती कधी सुरू तर कधी बंद राहिल्याने देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील काही भाजीपाला उत्पादकांनी पर्यायी बाजार म्हणून पुणे बाजार समितीला पसंती दिली. या बाजार समितीत किफायतशीर दर मिळत होते. मात्र सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून पुणे शहरात पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. तयार झालेला भाजीपाला पुणे बाजार समितीत पाठवता येणार नसल्याने त्याचे करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.   

  • नाशिकमधील अंदाजे भाजीपाला लागवड स्थिती (एकर) ः टोमॅटो - ४०००, कारले ५००, मिरची २०००, इतर भाजीपाला ५००. 
  • नाशिकमधून पुरवठा होणारा शेतीमाल ः भाजीपाला: शेवगा, वांगी, शेवगा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कारले. फळे : डाळिंब, आवळा, लिंबू, टरबूज. 
  • या आहेत अडचणी 

  • वाशी मार्केटमधील शेतीमाल वाहनांना असलेली मर्यादा, अस्थिर आंतरराज्य वाहतूक, पुण्यातील लॉकडाउन यामुळे शेतकरी, व्यापारी व वाहतूकदारांचे कामकाज अडचणीत. 
  • स्थानिक बाजारात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कमी दरात खरेदी होतेय. 
  • उठाव कमी झाल्याने शेतीमाल पडून 
  • जिल्ह्यातून पुण्यात १८ ते २५ वाहनांव्दारे होणारा भाजीपाला पुरवठा बंद 
  • दैनंदिन १५ लाखांची उलाढाल ठप्प 
  • प्रतिक्रिया

    पुणे येथे शेतमाल पाठवायचा होता पण गाडीच मिळाली नाही. त्यात आता पुण्यात लॉकडाउन सुरू झाल्याने नियोजन बिघडले आहे.  -हरी गायकवाड,भाजीपाला उत्पादक, तळवाडे भामेर, ता.सटाणा, जि.नाशिक.    पुण्यात भाजीपाला विक्रीसाठी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे शेतीमालाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.बाजारातील कामकाज बंद होणार असल्याने मागणीप्रमाणे शेतीमाल पाठवून दिला.मात्र लिंबू,शेवगा हा शेतमाल कमी दरात द्यावा लागल्याचे येथील भाजीपाला पुरवठादार सांगतात. शेतीमाल काढूनही त्याचा खर्च वसूल होणार नसेल तर तो फेकून द्यायचा का हा प्रश्न कायम आहे.  -नंदराज सूर्यवंशी,भाजीपाला पुरवठादार,मालेगाव,जि.नाशिक    कारले, भोपळे, दोडके पुण्यात विक्रीसाठी नेण्याची तयारी होती. मात्र आता तेथे लॉकडाउन झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील विक्रीचा शेवटचा पर्याय अडचणीत आल्याने आता पिके उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  - समाधान सावकार, भाजीपाला उत्पादक, ब्राह्मणगाव, ता.सटाणा, जि. नाशिक. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com