पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची सोलापुरातील शेतकऱ्यांवर वेळ

माझ्याकडे ७० गाई आहेत. त्यातील २५ दूधाच्या आहेत. रोज २०० लिटर दूध संकलन होते. एवढ्या जनावरांचे संगोपन करणे खरोखरच जिकिरीचे झाले आहे. दूधाला मागणीच नसल्याने दर मिळत नसल्याचे सांगितले जाते. पूर्वीचा धंदा आहे. लगेच मोडणे शक्य नाही, म्हणून करतो आहोत. करणार काय? - पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे दूध उत्पादकांना चिंता सतावत आहे. दुसरीकडे दूधाला मिळणारा दर आणि बिलेही वेळेवर मिळत नसल्याने खर्चाचा मेळ बसेना झाला आहे. त्यामुळे पदरमोड करुन व्यवसाय करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात जिल्हा दूध संघ, अकलूजचा शिवामृत दूध संघ हे दोन्ही सहकारी संघ वगळता अन्य सर्व दूध खासगी संघाला पुरवठा होते. सहकारी संघाचे संकलन १० ते २० टक्क्यांपर्यंत आहे. बाकी सर्वाधिक ८० टक्के दूध खासगी संघाकडे जाते. जिल्हा दूध संघाचे संकलन प्रतिदिन जवळपास दीड लाख लिटरपर्यंत होते, तर खासगीकडे १० लाख लिटरहून अधिक संकलन आहे. या दोन्हींचे दूध संकलनात लक्षणीय घट झाली आहे.

जवळपास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत ही घट असल्याचे सांगण्यात आले. आधीच कोरोनामुळे शेतकरी विविध समस्यांशी दोन हात करत कसाबसा दूध व्यवसाय सांभाळत असताना, त्यात आता दूध दर आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे चिंता आणखीनच वाढली आहे.

पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ सध्या पशुखाद्याचे पोते (५० किलो) १२०० ते १४०० रुपये, खापरी पेंड (५० किलो) २२०० ते २४००, मका भरडा (५० किलो) ८०० ते ९०० रुपये असे दर आहेत. पूर्वी गाईच्या दूधाचा ३० ते ३२ रुपयांपर्यंत असणारा दर आता १८ ते २० रुपयांवर खाली आला आहे. तर, म्हशीच्या दूधासाठी ३२ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. फॅट कमी निघाल्यास त्यापेक्षाही आणखी दर कमी होतो. कोरोनामुळे सध्या दूधाच्या उपपदार्थांची मागणी घटल्याने दूधाची मागणी कमी झाली आहे. शिवाय दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर ३०० रुपयांवरुन १५० रुपयांवर, बटरचा दर ३५० रुपयांवरुन १८० रुपयांवर घसरल्याने दूधाला उठाव नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना दूध दर देण्यात अडचण असल्याचे सांगितले जाते.   खर्च, उत्पन्नाचा मेळ बसेना एका गाईचा एका दिवसासाठी दोन्ही वेळेचा ओला, सुका चारा आणि पशुखाद्याचा खर्च किमान १०० ते १५० रुपये इतका होतो. त्यात गाईचे दिवसाचे सरासरी दहा लिटर दूध गृहित धरले, तर १८ रुपये प्रतिलिटरचा दर विचारात घेता १८० रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून काहीच हाती लागत नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com