सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा फटका 

माझ्याकडे पेरुचे सात एकरांपर्यंत क्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वीच मला पेरुसाठी एसओपी आणि एमओपीची गरज होती. पण यंदा दरवर्षीच्या तुलनेत खतांच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. सध्या खतांची गरज असल्याने मिळेल त्या किंमतीत ते घेण्याशिवायही पर्याय नाही. -शरद गोडसे, शेतकरी, येवती, ता.मोहोळ, जि. सोलापूर .
 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर प्रमुख ग्रेडची ९७ हजार ८२१ मेट्रिक टन (९६ टक्के) खते उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या डीएपीचा सुमारे १० हजार ५७० टनांपर्यंत (८८ टक्के) आणि युरियाचा सुमारे २३ हजार ५४१ टन (६१.३५ टक्के) पुरवठा झाला आहे. खतांची पुरेशी उपलब्धता असली, तरी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून जादा दर आकारले जात असल्याने शेतकऱ्यांना अर्थिक झळ सोसावी लागत आहे. 

जिल्ह्यात यंदा पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. साहजिकच, वेळेवर पेरणी झाल्याने पेराही जवळपास १०० टक्‍क्‍यांपुढे गेला आहे. सध्या पिके पोटऱ्यापर्यंत आली आहेत. या हंगामात प्रामुख्याने तूर, सोयाबीन, मूग, उडीद, मटकी आदी पिके घेतली जातात. अनेक भागात पेरणीबरोबर डीएपी, युरिया, १०ः२६ः२६ या खतांचा वापर सर्वाधिक होतो. त्यातही तूर आणि सोयाबीन पिकासाठी पेरणीबरोबर सर्वाधिक डीएपीचा वापर होतो, काहीजण पेरणीवेळी खते टाकतात, काही जण उगवण झाल्यानंतरही काही दिवसांनी खते टाकतात.

सध्या या पिकांबरोबर टोमॅटो, वांगी, दोडका आदी फळभाज्यांसह ऊस, पेरु, डाळिंब, केळी या पिकांना खतांची गरज आहे. त्यात एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्य या खतांची सर्वाधिक गरज आहेच. पण डीएपी, युरिया, एसओपी (सल्फर ऑफ पोटॅश), एसएसएपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या प्रमुख ग्रेडच्या खतांना सर्वाधिक उठाव आहे. पण काही विक्रेते डीएपी आणि युरियासाठी जादा दर आकारत असल्याचे दिसून येते. पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, करमाळा या ऊसपट्ट्यात या खतांना मागणी जास्त आहे. डीएपीचा सध्याचा दर प्रतिपिशवी १२०० ते १२५० रुपये आहे, पण १३०० ते १४०० रुपयांपर्यंत विक्री होतो आहे. युरिया साधारण २६७ रुपये आहे. पण त्यालाही ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो आहे.    पॉस मशीनचा वापर बंद  कोरोनामुळे सध्या पॉस मशीन बंद आहेत, आधारकार्डच्या आधारे खते वितरित होत आहेत. त्याच्याही नोंदी होत नाहीत, अनेकवेळा पावत्याही दिल्या जात नाहीत. त्यामुळे सगळा गोंधळ सुरु आहे. त्यात दुकानाच्या वेळा लॉकडाउनमुळे कमी असल्याने त्याचेही कारण देत, पावत्या देवाण-घेवाणीत वेळ दवडण्यापेक्षा खते घ्या आणि निघा, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वागणूक मिळते आहे. त्यामुळे खते विक्रीच्या पावत्यांचा विषय मागे पडतो आहे.    खतांची पुरेशी उपलब्धता  सोलापूर जिल्ह्यासाठी जूनअखेर डीएपी १० हजार ५७० टन, युरिया २३ हजार ५४१ टन, म्युरेट ऑफ पोटॅश १३ हजार ५८० टन, एनपीके १२ हजार ९८० टन, सिंगल सुपर फॉस्फेट ६ हजार १५० टन उपलब्ध झाले आहे. जून अखेर जवळपास ९६ टक्‍क्‍यांपर्यत ही खते उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com