परभणी : अर्धवट बॅंक खातेक्रमांकामुळे अनुदानास विलंब

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यात २०१९ मधील ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे पिके तसेच फळपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून प्राप्त अनुदान बॅंकांकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु, अनुदान यादीमधील अनेक शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक अर्धवट नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे थेट बॅंक खात्यावर अनुदान जमा होत नाही. शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्यासाठी बॅंकेत जावे लागत आहे. त्यात जिल्हा बॅंकेच्या ग्रामीण भागातील शाखांना होत असलेल्या अपुऱ्या चलनी नोटांच्या पुरवठ्यामुळे वेळेवर रक्कम काढता येत नसल्याने शेतकऱ्यांना बॅंकेत चकरा माराव्या लागत आहेत.

अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी या खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला. शेती पिकांच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत मंजूर आहे. बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ८७ कोटी ६२ लाख ७३ लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपये असे एकूण २७९ कोटी ११ लाख ५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

प्राप्त अनुदान जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ३ लाख २२ हजार ११३ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बॅंकेसह अन्य बॅंकांकडे वर्ग करण्यात आले. परंतु, संबंधित तलाठी तसेच अन्य यंत्रणांकडून अनुदानासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना चुकीचे तसेच अर्धवट बॅंक खाते क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खाते क्रमांकातील शेवटचे तीन अंक गायब असल्यामुळे बॅंकांना अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा करता येत नाही. त्यामुळे अनुदान रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत जाऊन जमेची स्लिप भरून द्यावी लागत आहे. त्यानंतरही अनुदानाची रक्कम जमा करण्यास बॅंकांकडून विलंब केला जात आहे.

बहुतांश शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकांच्या शाखांमध्ये आहेत. याद्यांमधील चुकीच्या खातेक्रमांकामुळे शेतकऱ्यांना अनुदान जमा करणे तसेच त्यानंतर रक्कम काढण्यासाठी बॅंकेत चकरा माराव्या लागत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बॅंकांनी आठवड्यातील प्रत्येक वारनिहाय कार्यक्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांना अनुदानवाटपाचे नियोजन केले आहे. परंतु, जिल्हा बॅंकेच्या ग्रामीण भागातील शाखांना दररोज चलनी नोटांचा पुरेसा पुरवठा होत नाही. खातेदार शेतकऱ्यांना एटीएम कार्ड देण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास विलंब लागत आहे.  

असे झाले होते नुकसान अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील ४ लाख ३७ हजार ५६१ शेतकऱ्यांचे ४ लाख ५४ हजार ६९८.३७ हेक्टरवरील जिरायती पिके, १ हजार ७१९.४८ हेक्टरवरील बागायती पिके, ५१५.७७ हेक्टरवरील फळपिकांचे असे एकूण ४ लाख ५६ हजार ९३३.६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com