सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर कृषिपंपाच्या प्रतीक्षेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या जोडणीचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप घेण्यावर भर दिला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३०५२ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपांची मागणी महावितरणकडे नोंदविली असून, यापैकी केवळ १९४ सौरपंप प्रत्यक्षात बसविले गेले आहेत. जिल्ह्यातील ११७३ शेतकऱ्यांनी कंपनी निवडून त्यांचे कोटेशन महावितरणला ऑनलाइन पद्धतीने सादर केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीस महावितरणकडून आवश्यक गती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

शेती पंपासाठी आठवड्यातील केवळ चार दिवस वीज उपलब्ध होते. त्यामुळे बागायतीसह जिरायती शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना दिवसाचे नियोजन करावे लागते. त्यातूनही काही कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास दिवसभराचा खोळंबा होतो. या सर्वांवर उपाय म्हणून सौर कृषिपंपाची योजना महावितरणने आणली. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना दहा टक्के, तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून पंप घेता येऊ शकतो. या पंपासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसभरात केव्हाही शेतीला पाणी देता येऊ शकते. यामध्ये पाच आणि तीन एचपीचे पंप उपलब्ध आहेत. 

सौर कृषिपंपाच्या अश्‍वशक्तीप्रमाणे किमती आहेत. यामध्ये तीन एचपीच्या कृषिपंपासाठी एक लाख ६५ हजार, तर पाच एचपीसाठी दोन लाख ४७ हजार १०६ रुपये किंमत असून, या किमतीच्या दहा टक्के रक्कम सर्वसाधारण शेतकऱ्यांना भरावी लागते. तर अनुसूचित जाती, जमातीसाठी पाच टक्के रक्कम भरावे लागते. या योजनेतून शासन व महावितरणच्या माध्यमातून एक लाख सौरपंप बसविले जाणार आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यात नियमित कृषिपंपाचे दहा हजारांवर कनेक्‍शन प्रलंबित असताना, आता सौर कृषिपंपासाठीही प्रतीक्षा यादी लागली आहे. 

अशी आहे स्थिती जिल्ह्यातील तीन हजार ५२ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप मागणीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी ११७३ शेतकऱ्यांनी कंपनी निवडून त्यांचे कोटेशन महावितरणला ऑनलाइन पद्धतीने दिले आहे. ९४४ शेतकऱ्यांनी दहा टक्के रक्कम भरलेली आहे. आत्तापर्यंत केवळ १९४ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवले गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com