विदर्भात टोळधाडीची दहशत कायम; नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची कसरत

मध्यप्रदेशातून मोर्शी, काटोल या संत्रा आगारात दाखल झालेल्या टोळधाडीची गेल्या तीन दिवसांपासून दहशत कायम आहे. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार अनेक शेतकरी कीडनाशकाची फवारणी पिकावर करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पिंप आणि आवाजाच्या माध्यमातूनही किडीला हुसकाविले जात आहे. त्यानंतरही भाजीपाला व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे मृगबहारातील संत्र्याला अपेक्षित दर मिळाला नव्हता. आता टोळधाडीमुळे आंबिया बहारातील उत्पादनावरही परिणाम होणार आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने एकरी २५ हजार रुपयांची भरपाई जाहीर करावी. त्याकरिता राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. - मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज.
ऐरोली येथे धूर करुन टोळधाडीला हूसकावण्याचा प्रयत्न करताना कृषी विभागाचे कर्मचारी
ऐरोली येथे धूर करुन टोळधाडीला हूसकावण्याचा प्रयत्न करताना कृषी विभागाचे कर्मचारी

नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून हुसकावल्यानंतर टोळधाडीची एक झुंड मध्यप्रदेशात परतली. मात्र, दुसरी झुंड नागपूर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याने तेथील यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात टोळधाडीची तिसऱ्या दिवशीही (बुधवारी) दहशत कायम होती. मध्यप्रदेश सीमेलगतच्या राज्यातील इतर गावांमध्येही या टोळधाडीचा शिरकाव होण्याच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला गेला आहे. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा तसेच मोसंबी झाडांवरील नवतीचा फडशा टोळधाडीने पाडला. संत्रा उत्पादनावर याचा परिणाम लक्षात घेता एकरी २५ हजारांची भरपाई देण्याची मागणी महाऑरेंजने केली आहे.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या वीस कोटींच्या टोळधाडीची दहशत तिसऱ्या दिवशी देखील कमी झाली नव्हती. अमरावती जिल्ह्यातील पुसला गावात भाजीपाला, जंगलातील सागवान व इतर झाडांवरील हिरवी पाने किडीने फस्त केली. कृषी विभागाने मंगळवारी रात्रीच ब्लोअरच्या माध्यमातून फवारणी केली. त्यानंतर ही कीड बुधवारी (ता. २७) सकाळी महाराष्ट्रातून परत मध्य प्रदेशातील गावांकडे गेल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी दिवसभर टोळधाडीचे अस्तित्व अमरावती जिल्ह्यातील गावांमध्ये दिसून आले नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यातून देखील या किडीला हुसकावण्याचे प्रयत्न शेतकरी आणि कृषी विभागाकडून होत आहे. सुरुवातीला विशिष्ट वासामुळे संत्र्याची पाने ही कीड खात नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. परंतू दोन दिवसांपासून अनेक बागातील संत्रा नवती या किडीने फस्त केली. सावनेर, काटोल भागात आंबिया बहाराच्या फळांच्या उत्पादनावर यामुळे परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक संत्रा बागांचे किडीमुळे नुकसान झाल्याची शक्‍यता आहे. नागपूर जिल्ह्यातून हुसकावल्यानंतर ही कीड पुढे सरकत मौदा तालुक्‍यातील एरोलीपर्यंत गेली. येथून भंडारा जिल्हा अवघा दहा किलोमीटरवर असल्याने त्या जिल्ह्यात ही कीड जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा कृषी विभाग व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र उशिरापर्यंत एरोली भागातच या किडीचे वास्तव्य दिसून आले.

कृषी सचिवांकडून आढावा बुधवारी (ता. २७) सकाळी मोबाईल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूर, अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांशी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी संवाद साधला. टोळधाड हुसकावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच कृषी अधिकारी, फिल्डस्टाफचे कौतुक त्यांनी केले. `मध्यप्रदेश लगतच्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट` याबाबत कृषी आयुक्त सुहास दिवसे म्हणाले, की अमरावती जिल्ह्यात दाखल झालेला टोळधाडीचा झुंड मध्यप्रदेशात परतला आहे. नागपूर जिल्ह्यात असलेली एक झुंड भंडारा जिल्ह्यात प्रवेश करेल, अशी स्थिती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती निवारण काळात वापरण्यात येणारे लाईट टॉवर आज रात्री फवारणीची गरज पडल्यास वापरण्याचे प्रस्तावित आहे. रात्री फवारणी करताना उजेडाची मोठी अडचण भासली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही कीड रात्री संत्रा, लिंबू, निंब, मोसंबी, बांबू व इतर झाडांवर वास्तव्य करते. साधे फवारणी यंत्र तेथपर्यंत पोचत नाहीत. परिणामी अग्निशमन बंबांचा वापर यापुढे फवारणीसाठी केला जाईल.

या यंत्रामुळे पाणी आणि कीटकनाशकाची मात्रा अधिक लागत असली तरी प्रभावही अधिक आहे. क्‍लोरपायरिफॉस हे कीटकनाशक देखील यावर प्रभावी दिसले आणि ७० ते ८० टक्‍के नियंत्रण यामुळे मिळाले. धुळे, नंदूरबार, जळगाव भागात ही कीड आल्याचे उदाहरण आहे. सातपुडा ओलांडून विदर्भात कधीच टोळधाड आल्याचे ऐकिवात नाही. उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ती आली असावी. राज्याच्या इतर भागात टोळधाड शिरकाव करण्याची चिन्हे नसली तरी आम्ही मात्र मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. विदर्भात कृषी विभागाच्या पथकाने कोरोनाचे संकट असताना कीड नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत, असे श्री. दिवसे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com