सातारा जिल्ह्यात आल्याच्या लागवडपूर्व कामांना गती

सातारा ः जिल्ह्यात आले लागवडपुर्व कामांना गती आली आहे. बेणे काढणे, खरेदी करणे तसेच शेतात विविध कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरात अस्थिरता असली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर आले लागवड होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात आले लागवडपुर्व कामांना गती आली आहे. बेणे काढणे, खरेदी करणे तसेच शेतात विविध कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरात अस्थिरता असली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर आले लागवड होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, खटाव या तालुक्यात आले पिकाची लागवड होते. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टरवर आले पिकाची लागवड होते. परंपरेनुसार अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर आले लागवड केली जाते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून अक्षय तृतीयेदरम्यान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहत असल्याने आले लागवड मे अखेरीस व जून महिन्याच्या सुरुवातीला केली जात आहे. गतवर्षी या सणाच्या मुहूर्तावर आले लागवड करण्यात आली होती.

मात्र कडक उन्हामुळे बेणे गाभाळून उगवणीवर मोठा परिणाम झाला होता. सध्या बेणे काढणी तसेच बेणे खरेदी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. शेतकरी शेतकऱ्यांकडून बेणे खरेदी करीत आहे. तसेच औरंगाबादहून मोठ्या प्रमाणात बेण्याच्या गाड्या येत आहेत. सध्या बेण्याच्या एका गाडीची (५०० किलो) २२ हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत बेण्याचे दर कमी आहेत. गतवर्षी प्रतिगाडीस ३५ हजार रुपयांपर्यंत दर होता. सध्या आल्याचे दर कमी असल्यामुळे बेण्याच्या दरातही घसरण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बेणे खरेदी किंवा काढणी सुरू केली आहे.

बेणे लागवडयोग्य होण्यासाठी घरात, शेडमध्ये आले बेण्याची अढी लावण्याची कामे सुरू आहेत. तसेच आले पिकास शेणखताची आवश्यकता असल्यामुळे सध्या शेतात शेणखत, पोल्ट्री खत, लेंडी खत, कारखान्यांचे कंपोस्ट खत टाकण्याची तसेच नांगरट, फणणी आदी कामे सुरू आहेत.

सध्या सर्वत्र लॅाकडाउन असल्यामुळे मजूर टंचाई भासत आहे. त्यामुळे खोदणीस अडचणी येत आहेत. कमी थंडीमुळे सध्या जमिनीत आले पिकास कोंब येत आहे. दोन, तीन वळवाचे पाऊस झाले आणि ३३ अंश सेल्सिअसच्या आत तापमान राहिले तर मेच्या सुरवातीपासून लागवडी सुरू होतील. अन्यथा मेअखेर व जून सुरूवातीस आले पिकाच्या लागवडीची कामे सुरू होतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.    जूनमध्ये अंतिम चित्र स्पष्ट होणार  गतवर्षाच्या तुलनेत सध्या आल्याचे दर कमी आहेत. मात्र हे दर सतत कमी-जास्त होत असतात. बेण्याचे दर कमी असल्यामुळे तसेच पाण्याची उपलब्ध असल्याने गतवर्षीपेक्षा अधिक आले लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. यावर्षी यामध्ये दोनशे ते तीनशे हेक्टरने वाढ होण्याची शक्यता असली तरी जून महिन्यातच आले लागवडीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com