वऱ्हाडात बाजार समित्यांमधील व्यवहार पुर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धडपड 

​ अकोला ः लॉकडाउनमुळे वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये ठप्प असलेले व्यवहार सुरु करण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरु आहे. काही ठिकाणी व्यवहाराची घडी बसू लागली असून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाले आहेत. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून हे व्यवहार होत आहेत. तरीही सध्या देण्यात आलेली दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ आणि माल वाहतुकीच्या अडचणींमुळे आवक मात्र तितकीशी सुधारलेली नाही. सध्या शेतीमालाची १० टक्केही आवक होताना दिसत नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अगोदर नोंदणी, पीकनिहाय बाजार अशा विविध उपाययोजना केल्या आहेत.
कारंजा बाजार समितीत गर्दी नियंत्रणासाठी शेतीमालाची अशी आखणी करण्यात आली.
कारंजा बाजार समितीत गर्दी नियंत्रणासाठी शेतीमालाची अशी आखणी करण्यात आली.

अकोला  ः लॉकडाउनमुळे वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये ठप्प असलेले व्यवहार सुरु करण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरु आहे. काही ठिकाणी व्यवहाराची घडी बसू लागली असून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाले आहेत. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून हे व्यवहार होत आहेत. तरीही सध्या देण्यात आलेली दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ आणि माल वाहतुकीच्या अडचणींमुळे आवक मात्र तितकीशी सुधारलेली नाही. सध्या शेतीमालाची १० टक्केही आवक होताना दिसत नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अगोदर नोंदणी, पीकनिहाय बाजार अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. 

शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार गेले महिनाभर ठप्प असल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून काही प्रमाणात हे बाजार पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत बाजार समिती प्रशासन, व्यापारी, अडत्यांसोबत समन्वय करीत बैठका घेतल्या. यातून एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी, दिवस व पीकनिहाय बाजाराचे नियोजन समोर आले.

जसे अकोला बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. विनानोंदणीचा शेतीमाल मार्केट यार्डमध्ये स्वीकारण्यात येणार नाही. ज्या दिवशी शेतीमाल विक्रीची नोंदणी केली त्याच दिवशी आणावा लागेल. अन्यथा नोंदणी रद्द होऊन नव्याने करणे भाग आहे. एका दिवशी एकाच शेतमालाचा लिलाव केला जाईल. यात सोमवार व मंगळवारी हरभरा, बुधवार व गुरुवारी तूर तर शुक्रवारी आणि शनिवारी गहू, सोयाबीन व इतर शेतमालाची विक्री केली जाईल. नोंदणी केलेल्या शेतीमालाची आवक सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. अशाच उपाययोजना अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील प्रत्येक बाजार समितीकडून केल्या जात आहेत. 

‘कोरोना’रोखण्यासाठी उपाययोजना  बाजार समितीत गर्दी टाळत व्यवहार सुरळीत केले जात आहेत. येणाऱ्या शेतकऱ्यांना किमान चार ते पाच फूट अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात येते. तसेच खरेदीदार, अडते यांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवहार करणे, दुकानात हॅण्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करणे, शेतकऱ्याने आपल्याच शेतमालाजवळ थांबणे, बाजार समितीत शेतमाल खरेदी, विक्रीसंबंधी घटकांनाच प्रवेश दिला जात आहे. 

वाशीम जिल्ह्याची आघाडी  जिल्ह्यात बुधवारपासून (ता.१५) बाजार समित्या सुरू झाल्या. मालेगाव येथे पहिल्याच दिवशी ९३६ क्विंटल शेतीमालाची आवक झाली होती. यात तुरीची १७८, हरभऱ्याची ५२६, गव्हाची २१४ तर सोयाबीनची २८ क्विंटल आवक झाली. मंगरुळपीर व शेलुबाजार याठिकाणी पहिल्याच दिवशी १७८३ क्विंटल शेतीमाल खरेदी करण्यात आला आहे. मानोरा बाजार समितीमध्ये ४८० क्विंटल शेतीमालाची खरेदी झाली. कारंजा लाड येथील बाजार समितीत पहिल्याच दिवशी गव्हाची १२४० क्विंटल आवक झाली होती. 

बुलडाण्यात १० टक्केच आवक  जिल्ह्यातील बाजार समित्या सुरु करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत सातत्याने समन्वय साधला. त्यांनी प्रत्येक बाजार समिती सचिवांचा संपर्क क्रमांक शेतकऱ्यांसाठी जाहीर केला. काही बाजार समित्यांमध्ये आवक काहीशी सुरु झाली. मात्र हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. वाहतूक, कामगारांची अडचण, कोरोनाची भीती यामुळे शेतकरी अद्याप बाहेर पडले नसल्याचे सांगितले जाते. 

ठळक मुद्दे 

  • बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न 
  • शेतमाल विक्रीसाठी पूर्व नोंदणी आवश्यक 
  •  पीकनिहाय बाजाराचे दिवस निश्चित 
  • सध्या वेळ कमी असल्याने अडचण 
  •  बाजार समित्यांमध्ये सरासरी १० टक्केच आवक 
  • कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना असूनही भिती कायम 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com