बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा काळवंडला

माझी सहा एकरांवर द्राक्षबाग आहे. गेल्या पंधरवाड्याच्या आणि आताच्या परिस्थितीत खूपच फरक पडला आहे. खरेदीदार येत नाहीत. सध्या ऊन वाढल्याने फटका बसतो आहे. द्राक्षं काढली तर विकायची कुठे, दर किती मिळणार, याची चिंता लागली आहे. यंदा खर्चही निघतो की नाही, हे समजत नाही. - महेश काटमोरे, पिंपरी (सा), जि. सोलापूर.
 पिंपरी (सा) येथील महेश काटमोरे यांच्या द्राक्षबागेत घड खराब होऊ लागले आहेत.
पिंपरी (सा) येथील महेश काटमोरे यांच्या द्राक्षबागेत घड खराब होऊ लागले आहेत.

सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर द्राक्षांना उठाव नसल्याने बार्शी तालुक्यातील हिंगणी, पिंपरी, ढाळेपिंपळगाव, मळेगाव या द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, खरेदीदारांविना द्राक्षे जागेवरच राहिल्याने अक्षरक्षः बागांबरोबरच शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडून गेले आहेत.   

बार्शी तालुक्यातील ढाळेपिंपळगाव आणि हिंगणी प्रकल्पामुळे या पट्ट्यात द्राक्षक्षेत्र सर्वाधिक आहे. सुमारे ४०० हून अधिक एकर क्षेत्रापर्यंत ते विस्तारले आहे. पण सध्या ‘कोरोना’मुळे देशात सुरू असलेला लॉकडाऊन, वाढणारी उष्णता व अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांवर अभूतपुर्व संकट कोसळले आहे. विक्रीसाठी तयार झालेली द्राक्ष जास्त काळ वेलींवरच राहणार असल्याने पुढील वर्षीच्या द्राक्ष उत्पादनावर देखील मोठा परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रामुख्याने हिंगणी, पिंपरी (सा) मळेगाव, पिंपळगाव, जामगाव, साकत, महागाव, बावी परिसरातील दर्जेदार द्राक्षांना देश व राज्यभरातून मोठी मागणी असते. येथील द्राक्षे दिल्ली, चंद्रपूर, नागपूर, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तसेच परदेशात देखील दरवर्षी पाठवली जातात. मात्र निर्यातबंदी, बंद ठेवलेल्या बाजारपेठांमुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यंदा तर गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या आपत्तीतून द्राक्ष बागा कशाबशा जगवल्या, पण आता पुन्हा हे नवेच संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.    खरेदीदारांची पाठ, दरातही घसरण पंधरवड्यापूर्वी हीच द्राक्षे ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदीदार मागून नेत होते. पण आता त्याचे दर निम्म्यावर म्हणजेच २० ते २२ रुपयांवर आलेच, पण ते नेतील का नाही, याची खात्री नाही. त्यामुळे द्राक्ष पाठवायची कुठे असा सवाल द्राक्ष उत्पादक करीत आहेत. स्वतः वाहन करुन पुणे, मुंबईच्या बाजारपेठांत नेणेही शक्य नाही. आता एकदमच सगळा माल तिकडे जाणार, त्यामुळे चोहोबाजूंनी कोंडी होऊन बसली आहे. 

उष्णतेची भर, आर्थिक गणित बिघडणार वाढत्या उष्णतेमुळे व वाढणाऱ्या साखरेमुळे द्राक्षे खराब होत आहेत. ‘कोरोना’चे संकट कायम असताना आता तापमानही ३७ ते ३८ अंश सेल्सियसच्यापुढे चालले आहे. मळेगाव येथील विलास गडसिंग यांच्या तीन एकर बागेचे उष्णतेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच हिंगणी येथील बिभीषण माळवदे, राजाभाऊ शेळके, आनंद काशीद, लालासाहेब गव्हाणे, बाळासाहेब माळवदे, सुलतान नागरगोजे, पिंपरी (सा)येथील प्रवीण काशीद, महेश काटमोरे, रामचंद्र काटमोरे, भास्कर काशीद, रामविजय वायकर, शिरीष काशीद, बळवंत वायकर, संदीप काशीद यांच्या द्राक्षबागांनाही वाढत्या उष्णतेचे परिमाण सहन करावे लागत आहेत. या द्राक्षउत्पादकांनी आपली चिंता व्यक्त केलीच. पण पुढील वर्षभराचे आमचे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com