ढगाळ हवामान, पावसामुळे द्राक्ष, बेदाण्याला फटका बसण्याची शक्यता

जत तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांत पाऊस झाला. त्याचा फटका बेदाणानिर्मितीस बसला आहे. यामुळे बेदाणा काळा पडण्याची शक्यता असून त्याचा दर्जाही घसरणार आहे. - विठ्ठल चव्हाण, बेदाणा उत्पादक, उमदी, जि. सांगली.
पावसाच्या शक्यतेमुळे बेदाणा शेड अशा झाकल्या जात आहेत
पावसाच्या शक्यतेमुळे बेदाणा शेड अशा झाकल्या जात आहेत

सांगली  ः जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी (ता.१) पाऊस झाला. या पावसाचा फटका काढणीला आलेली द्राक्षे आणि बेदाण्याला बसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे बेदाणा तयार होण्यास विलंब लागणार आहे. तसेच बेदाण्याचा दर्जाही घसरण्याची शक्यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला गती आली आहे. द्राक्षांना गेल्यावर्षीच्या तुलनेत चालूवर्षी प्रतिकिलो २० रुपयांनी दर अधिक आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, जिल्ह्यात रविवारी (ता. १) दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. बहुतांश ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी वापरावी लागणार आहेत. तसेच गोडी कमी होऊन द्राक्षांच्या दर्जावर परिणाम होईल, असे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. 

बेदाण्याला फटका सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि जत तालुक्याच्या पूर्व भागात बेदाणानिर्मिती होते. गेल्या महिन्यातदेखील ढगाळ वातावरण होते. त्यामुळे त्याचा फटका बेदाणानिर्मितीला बसला होता. कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण होते. त्यातच जत तालुक्याचा पूर्व भागात पाऊस झाल्याने बेदाण्याला फटका बसला आहे. त्यामुळे बेदाणा तयार होण्यास विलंब होणार आहे. त्यातच बेदाणा ओलसर राहणार असून काळा पडण्याची शक्यता आहे.  हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्ष मणी तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षाचा दर्जा कमी होण्याची शक्यता असल्याचे पलूस येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती चव्हाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com