पुणे जिल्ह्यातील ६६ हजार स्थलांतरित नागरिकांना मिळणार अन्नधान्य

शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत. - रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित व कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या मजूर नागरिकांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी शरद भोजन योजनेतून अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्हाभरात सर्वेक्षण करून यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. २४ हजार ३७२ कुटुंबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना महाराष्ट्र दिनापासून गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

देशात टाळेबंदी जाहीर केल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातील अनेक नागरिक अडकून पडले. रेशनिंग कार्ड व इतर कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षणानंतर लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर अद्याप देखील काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु तुर्तास सर्वेक्षण थांबवण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत (ता.२८) आकडेवारीनुसार शुक्रवारी (ता.१) प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.

चाकण आणि रांजणगाव एमआयडीसीमुळे खेड, शिरूर तालुक्यात, तर हवेली आणि मुळशी या तालुक्यांच्या शहरालगतच्या भागात उदरनिर्वाहासाठी राज्याच्या इतर भागातून आलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. खेड तालुक्यातील सर्वाधिक ११ हजार ३५८, शिरूरमधील ११ हजार २६०, आणि मुळशीतील ११ हजार १३८ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय मुळशी तालुक्यात ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील ५ हजार ३०७, पुरंदरमधील ३ हजार ८८९, भोरमधील ४ हजार १०२, बारामतीमधील १ हजार ७५१, इंदापूर २ हजार ११६, जुन्नरमधील १ हजार ८७८, मावळ १ हजार २११, आंबेगाव ८१५, वेल्हा २९३ नागरिकांना, तसेच जेजुरी नगरपालिका हद्दीतील १ हजार ११३, भोर १४२, शिरूर २०० आणि इंदापूर नगरपालिका हद्दीतील ११६ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ दिले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com