एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाइन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाइन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यातील कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप मंगळवारी (ता. ७) झाला. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे म्हणाले, की शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘जे विकेल तेच पिकेल’ या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणावे. यासाठी विभागवार पिकांचे नियोजन करावे. हे शासन शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन दमदारपणे पावले टाकत आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वच जण घरी बसून काम करीत आहेत. शेतकऱ्याला मात्र प्रत्यक्ष शेतात राबावे लागतो. त्याच्यामुळे जगाला अन्नधान्याचा पुरवठा होतो. शेतकरी कुठल्याही संकटाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे.

महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विकसित तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्यांना दिली तर कमी क्षेत्रात भरघोस पीक उत्पादन घेणे शक्य होईल. ज्या शेतीमालाला बाजारपेठ आहे, त्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे. तसेच रसायन अवेशषमुक्त पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. राज्य शासनामार्फत त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने रसायन अवशेषमुक्त शेतीचे महत्त्व पटवून देताना सेंद्रिय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वजण घरी असताना शेतकरी शेतात राबतोय. शेतकऱ्याला एक गोष्ट मात्र घरी बसून मिळणार आहे ती म्हणजे सर्व योजनांचा लाभ घेण्याची सुविधा. ‘कोरोना’च्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविली गेली. त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना त्याच्या मुळावरच घाव घालावा. 

`शेतमजुरांसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण` कृषिमंत्री भुसे म्हणाले, की पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीवर आधारित कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २३ हजार ५०६ गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली असून त्यात ३६०६ शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्याआधारित प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com