संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळाला मदतीचा हात...

‘सकाळ - ॲग्रोवन’चे खरोखर खूप आभारी आहोत. आपल्यामुळे पुण्यातील साहेबांनी आम्हाला मोठी मदत केली. यापुढेही मी मदत करेन असे त्यांनी सांगितले आहे. खरोखरच गरिबांना मदत करणारा तो खरा देवमाणूच होता. - यशवंत खंडागळे,नुकसानग्रस्त शेतकरी, संगेवाडी
यशवंत खडांगळे यांना मदत देताना प्रशांत बिराजदार
यशवंत खडांगळे यांना मदत देताना प्रशांत बिराजदार

सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संगेवाडीतील शेतकरी यशवंत खंडागळे यांचे देखील पिकांसह मोठे अर्थिक नुकसान झाले. याबाबतचे वृत्त `सकाळ` आणि `ॲग्रोवन`मध्ये प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत पुणे येथील एका उद्योजकाने खंडागळे यांना मदतीचा हात दिला.

अतिवृष्टीमुळे दोन महिन्यांपूर्वी राज्यातील शेतीक्षेत्राला जबर फटका बसला. त्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. डाळिंबाचे आगार असलेला सांगोला तालुकाही त्यातून सुटला नाही. याच तालुक्‍यातील संगेवाडीतील यशवंत खंडागळे या शेतकऱ्याची प्रातिनिधिक व्यथा ‘कळ्या अन्‌ फुलंच न्हाई, तर पावसानं आमचं नशीब बी झोडून नेलं’ अशा मथळ्याखाली ‘ॲग्रोवन’ आणि ‘सकाळ’च्या २१ नोव्हेंबरच्या अंकामध्ये ‘अवकाळीच्या कळा’ या सदरात मांडण्यात आली. सदर वृत्तातील खंडागळे कुटुंबीयांची व्यथा वाचून पुणे येथील उद्योजक प्रशांत बिराजदार यांनी सोमवारी (ता. २) संगेवाडीत येऊन शेतकरी यशवंत खंडागळे यांना रोख २३ हजार ११ रुपयांची आर्थिक मदत तर दिलीच, पण त्यांच्या पत्नीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी साह्य करण्याचे, तसेच मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देत औदार्य दाखवले.

श्री. बिराजदार यांच्या या दातृत्वाने खंडागळे कुटुंबीय भारावून गेले. अनपेक्षितपणे त्यांना या संकटसमयी मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर उमटलेच, पण ‘ॲग्रोवन’ आणि ‘सकाळ’चे खासकरून त्यांनी आभार मानले आहेत. यशवंत खंडागळे यांची हलाखीची कौटुंबिक स्थिती आणि त्यात अतिपावसाने मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागेत झालेल्या फुलगळतीने उत्पन्नाचा हमखास मार्ग तर संपलाच, पण नव्याने उभे राहण्यासाठी त्यांची ताकद कमी पडणार होती. त्यातच खंडागळे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचे व पत्नीच्या आरोग्याचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा होता. मोलमजुरी करूनही कुटुंबाचा फक्त उदरनिर्वाहच होत असल्याने डाळिंबीच्या झालेल्या नुकसानीचा मोठा आघात भरून निघणे अवघड होते. शिवाय बॅंक आणि उसनवारीचे कर्ज डोक्‍यावर; अशा सर्व परिस्थितीचे वार्तांकन या वृत्तामध्ये करण्यात आले होते,

श्री. बिराजदार हेही शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे, खंडागळे कुटुंबाची ही व्यथा वाचून त्यांनी काय मदत करता येईल, याचा विचार केला आणि थेट त्यांच्या घरी जात ही मदत केली. याबाबत श्री. बिराजदार म्हणाले, की माझ्या मदतीमुळे त्यांना फार मदत होईल असे नाही. पण थोडासा आधार द्यावा, शक्‍य आहे ते करावे, या भावनेने मी ही मदत केली. यापुढेही त्यांच्या पत्नीच्या डोळ्याचे ऑपरेशन व मुलाच्या नोकरीसाठी शक्‍य ती मदत करू. कोणतीही अडचण येऊ द्या, मला फोन करा, अशा सूचनाही त्यांनी खंडागळे कुटुंबाना केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com