जलशक्ती अभियान उपक्रमाचा नगर जिल्ह्यातील आठ गावांना फायदा 

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत युनिसेफच्या मदतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमातून पाणीसाठा वाढीला मदत झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील गावांना याचा नक्की फायदा होईल. - संजय चव्हाण, जिल्हा समन्वयक
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः जिल्ह्यात जलशक्ती अभियानातून राबवण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील आठ गावांतील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील ८ गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून १ कोटी ९२ लाख लिटर पाण्याची साठवण झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील गावांना याचा यंदा चांगला फायदा होणार आहे.   जलयुक्त शिवार अभियानच्या यशानंतर आता भूजलपातळी वाढीसाठीचे उपक्रम राबवण्यासाठी जलशक्ती अभियान राबवले जात आहे. यंदा शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांची त्यासाठी निवड केली आहे. मात्र, या तालुक्यांव्यतिरिक्त युनिसेफ आणि महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान संस्थेकडून दुष्काळाच्या गंभीर झळा सोसलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील आठ गावांत प्रायोगिक तत्त्वावर पाणीपातळी वाढीसाठी उपक्रम राबवला गेला. त्यात कर्जत तालुक्यातील औटेवाडी, बेलगाव, बजरंगवाडी, चांदे बु. व जामखेड तालुक्यातील सावरगाव, घोडेगाव, डोनगाव या गावांत उपक्रम राबवण्यात आले. उपक्रमात राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २० गटांची निवड करण्यात आली होती. यात नगर जिल्ह्याचाही समावेश आहे. मोहिमेचा पहिला टप्पा ८ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पडला. दुसऱ्या टप्प्यात १ ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमातून जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, तलाव खोलीकरण, शोष खड्डे, पुनर्भरणासाठी विहिरी आणि कूपनलिका, पावसाचे पाणी जिरवणे आणि नाल्यांमधील गाळ काढणे अशी कामे करण्यात आली. 

सोशल मीडियाचा झाला फायदा  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत काम करताना जिल्हा आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांशी समन्वय राखला. कामाच्या प्रगतीची माहिती एकमेकांना दिली. जिल्हा पातळीवर नियोजन आणि समन्वय ठेवल्यामुळे त्यांना निधीसाठी पाठपुरावा करणे आणि उपलब्ध सामग्रीचा वापर करणे शक्‍य झाले. चांगल्या उपक्रमाला त्याचा फायदा झाला. 

या कामांवर ११ लाख ४८ हजार रुपये खर्च करण्यात आला. या उपक्रमातून ३७९ कुटुंबांना या कामांचा लाभ मिळाला. ८ गावांमध्ये ११ हजार ३०० वृक्षांची लागवडही करण्यात आली. उपक्रमाला युनिसेफच्या तांत्रिक साह्यासह पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि बारामती ॲग्रो या संस्थांचे सहकार्य मिळाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com