नगर जिल्ह्यात नरेगाच्या कामांवर साडेआठ हजारांवर मजूर

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः उन्हाळ्यास सुरुवात झालेली असतानाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (नरेगा) मजुरांच्या संख्येत मात्र अजूनही फारशी वाढ झालेली दिसत नाही. जिल्ह्यात सध्या १ हजार ८६५ कामे सुरू असून, त्या कामांवर आठ हजार ६४३ मजूर कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. 

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) वैयक्तिक लाभाची कामे केली जातात. मजुरांनी रोजगाराची मागणी केली की कामे उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्यात ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागात मजुरांना कामांची आवश्यकता भासत असते. यंदा मात्र उन्हाळा सुरू होऊनही रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची संख्या फारशी दिसत नाही.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या १ हजार ६५ कामे सुरू असून त्या कामांवर आठ हजार ६४३ मजूर कार्यरत आहेत. त्यात ग्रामपंचायत विभागाची ११६८ कामे सुरू असून त्यावर ४०६४ मजूर कार्यरत आहेत. अन्य यंत्रणांच्या ६९७ कामांवर ४५७९ मजूर कार्यरत आहेत. याशिवाय ग्रामपंचायतींची २१ हजार ९८८ आणि यंंत्रणांची ९ हजार ८३६ कामे मंजूर असल्याचे सांगण्यात आले. 

यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे शेतीत कामे सुरू असल्याने नरेगाच्या कामांवर मजूर येत नसल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये या कामांवर मजूर संख्या वाढेल, असा अंदाज आहे. सध्या जामखेडमधील नरेगाच्या कामांवर सर्वाधिक मजूर आहेत, तर सर्वात कमी कोपरगावमधील नरेगाच्या कामांवर आहेत.   

जिल्ह्यातील कामांची स्थिती
तालुका  सुरू कामे  मजुरांची संख्या
अकोले  २०९  ६९५
जामखेड २५५  १२५१
कर्जत   १५६ ११३९
कोपरगाव १३१ २७९
नगर ७४  ३५४
नेवासा ७६  ४३१
पारनेर  १३०  ७३०
पाथर्डी  १८१ १०१३
राहाता  ६९  ३४३
राहुरी  १७२ ३२९
संगमनेर ११३ ४६९
शेवगाव  ९७  ६०९
श्रीगोंदा    १३५  ५७३
श्रीरामपूर   ६७ ४२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com