आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातच

सध्या संख्येत कमी असलेल्या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग, राज्याच्या कृषी मंत्रालयाने यापूर्वी वारंवार प्रादुर्भाव झालेल्या हरियाणा, पंजाबमधून मार्गदर्शन घेण्याची गरज वाटते. त्या भागात ड्रोनचा पर्याय वापरण्यात आला आहे. गरज पडल्यास हेलीकॉप्टरचाही उपयोग फवारणीकामी करण्याचे त्या ठिकाणी प्रस्तावित केले आहे. अशाप्रकारच्या प्रभावी उपाययोजना आताच राबविल्या तर भविष्यातील मोठे संकट टाळता येईल. - नलीन कुकडे, सबकुंड, ता. काटोल, जि. नागपूर.
गणेशपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख
गणेशपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याने ‘कोरोना’मुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. विदर्भातील टोळधाडीचे संकट वाढत असल्याने शनिवारी (ता.३०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काटोल तालुक्‍यातील गणेशपूर भागात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतावर जात परिस्थितीचा आढावा घेतला.

मध्यप्रदेशातून टोळधाड अमरावती जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर वर्धा, नागपूर भागात पोचलेल्या टोळधाडीच्या झुंडीने भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबीचे नुकसान केले. प्राथमिक सर्व्हेक्षणात अवघ्या ५० हेक्‍टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. रविवारपासून (ता.२४) विदर्भात असलेल्या टोळधाडीचा पूर्वी एकच असलेली झुंड आता तीन झुंडीत विभागली गेली आहे. या तीनही झुंडी लाखोंच्या संख्येत असून त्या नागपूर जिल्ह्यातील सावनेर तसेच काटोल तालुक्‍यात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या भागातील शेतकऱ्यांच्या शिवारातील भाजीपाला पिकाचा फडशा पाडणाऱ्या या टोळधाडीला हुसकावण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा राबत आहे. टोळधाड नियंत्रणासाठी नरखेड, काटोल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अग्निशमन बंब तसेच चार ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्राचा वापर गणेशपूर येथे करण्यात आला. सावनेर तालुक्‍यातील खापा, वाकीसह इतर दोन गावांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव होता. त्या भागातही प्रशासनाकडून नियंत्रणाचे उपाय राबविण्यात आले. शिवारात सध्या खाण्यासाठी भाजीपाला वगळता इतर पिके नसल्याने बांधावर असलेल्या झाडांची पालवी किडींकडून फस्त केली जात आहे, असेही कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.   `कीड नियंत्रणासाठी वाटेल ती यंत्रणा राबवा` दरम्यान, गणेशपूर येथे टोळधाड नियंत्रण सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. अग्निशमन बंब तसेच इतर कोणत्याही यंत्रसामुग्रीची गरज भासल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. कीटकनाशकांचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला असून शासनाचे स्थितीकडे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यावेळी उपस्थित होते.   मध्यप्रदेशशी सातत्याने संपर्क महाराष्ट्रात दाखल झालेली ही टोळधाड मध्यप्रदेशातून आली आहे. यापुढील काळात टोळधाड त्याच भागातून पुन्हा आल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळविता यावे याकरिता अमरावती, नागपूर जिल्ह्यातील कृषी अधिकारी मध्यप्रदेशातील कृषी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. बैतूल, भैसदेही हे जिल्हे अमरावतीच्या सीमेलगत आहेत. त्यासोबतच नागपूर जिल्ह्याच्या सीमा देखील मध्यप्रदेशशी संलग्न आहेत.

दरम्यान, विदर्भापासून ३०० ते ३५० किलोमीटर अंतरावरील इंदूर परिसरात टोळधाडीचा एक मोठा झुंड असल्याची माहिती तेथील प्रशासनाने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून टोळधाडीची झुंड नागपूर जिल्ह्यात आहे. मौदा तालुक्‍यातील तांडा परिसरातून सूर नदी वाहते. नदीचा हा परिसर वाळूमय आहे. टोळधाड अशाच भागात अंडी घालते. परिणामी कृषी विद्यापीठाच्या दोन तज्ज्ञांनी या किडींनी अंडी घातली का याची चाचपणी केली.

शनिवारी दुपारी साडेचार वाजता वाघोडा शिवारात टोळधाडीचा शिरकाव झाला. त्यानंतर कृषी विभागाने उपाययोजना करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून निंबोळी अर्काची फवारणी, धूर करणे आणि थाळी वाजविणे असे उपचार सांगण्यात आले. कृषी विभाग तसेच शासनाने गांभीर्य ठेवले तरच या किडीचे नियंत्रण शक्‍य वाटते, असे काटोल येथील हिम्मत नाखले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com