विठ्ठल जळीस्थळी भरला । रिता ठाव नाही उरला ।

माघी वारीसाठी पंढरपुरात भाविकांनी श्री विठ्ठल - रुख्मिणी दर्शनासाठी गर्दी केली
माघी वारीसाठी पंढरपुरात भाविकांनी श्री विठ्ठल - रुख्मिणी दर्शनासाठी गर्दी केली

विठ्ठल जळीस्थळी भरला । रिता ठाव नाही उरला । आजि म्या दृष्टीने पाहिला । विठ्ठलचि ।। पंढरपूर, जि. सोलापूर  ः माघी एकादशीच्या सोहळ्यात सहभागासाठी आणि सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी बुधवारी (ता. ५) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांमुळे अवघ्या पंढरीत जणू भक्तीचा मळा फुलला. सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. 

शहरातील मठ, धर्मशाळा, मंदिर, चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटासह पैलतीरावरील पासष्ट एकर परिसरात भाविक भजन, कीर्तन आणि प्रवचनात दंग झाले होते. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, अन्य मार्गांसह स्टेशन रस्त्यावर प्रासादिक वस्तू, सोलापूर चादरी, घोंगडी, फोटो फ्रेम, मूर्तींच्या दुकानांत भाविकांची गर्दी राहिली. अनेक भागांतून निघालेल्या पायी दिंड्यांचे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आगमन झाले. आलेल्या वारकऱ्यांची दशमीचा पर्वकाळ साधण्यासाठी चंद्रभागा नदीवर स्नानासाठी कालपासूनच लगबग सुरू होती.

बुधवारी एकादशीचा मुख्य सोहळा असल्याने वारकऱ्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग बुधवारी पुन्हा गोपाळपूर रस्त्याकडे गेली होती. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे चौदा ते पंधरा तासांचा कालावधी लागत होता. माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली.  रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.

पहाटे चार वाजता श्री विठ्ठल- रुक्मिणीची काकडा आरती झाली. त्यानंतर श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री. व सौ. विठ्ठल जोशी यांनी केली. नित्यपूजेस मंदिर समितीचे सदस्य माधवी निगडे, शंकुतला नडगिरे, व मंदिर समितीचे सल्लागार सदस्य सुनील रुकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com