राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस : डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

‘मार्च, एप्रिल व मे महिन्यांत सूर्यप्रकाशाचा कालावधी, कमाल तापमान, वाऱ्याचा वेग सरासरीपेक्षा कमी राहिल्याने जून, जुलै पावसात खंड पडतील. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मुख्य पिकाबरोबच अंतर पीक पद्धतीवर भर द्यावा, कपाशीच्या कमी कालावधीच्या जातीची लागवड करावी. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ व कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार असून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील, डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन २०२० मधील मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातील कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर आधारीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. साबळे म्हणाले, ‘‘यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज असला तरी काही भागात, काही कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याच्या काही भागात तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांमध्ये राहुरी, कोल्हापूर, अकोला, पेडगाव येथे पावसात मोठे खंड पडतील. तर दापोली, सोलापूर, पुणे, धुळे, निफाड, जळगाव सिंदेवाही, परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे.’’ मॉन्सून आगमनास वेळेवर होणार असले तरी जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहेत. बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनची शाखा जास्त सक्रिय होणे संकेत असून, पूर्व विदर्भ, मध्य विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसात वाढ होणे शक्य आहे. तसेच निफाड, दापोली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, परभणी, नागपूर येथेही पावसात वाढ होण्यास अनुकुल हवामान दर्शवत आहे. त्या विभागानुसार दिलेल्या पावसाच्या अंदाजात तालुकानिहाय फरक पडणे शक्य असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.   असे करा पीक नियोजन  पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धूळवाफेची पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये.

या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा, मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफूल या अवलंब करावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तूर अंतरपीक पद्धती अवलंबावी. पाणी साठवणुकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील.

खरीप पिके काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसानीपासून बचाव होईल. कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यात कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भात रोपांची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप उपलब्ध होईल, कोकणातील रायगड, ठाणे व पालघर या भागात भात पिकात काटेकोर पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. हळव्या जातीच्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक काढणीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर २०२०) ठिकठिकाणचा पाऊस :
ठिकाण सरासरी (मिमी) अंदाज (मिमी) टक्केवारी (+/- ५ टक्के)
अकोला ६८३.७ ६७० ९८
नागपूर ९५८ ९३८ ९८
सिंदेवाही(चंद्रपूर) ११९१ ११६७ ९८
परभणी ८१५ ७९८ ९८
दापोली ३३३९ ३२७२ ९८
निफाड(नाशिक) ४३२ ४२३ ९८
धुळे ४८१ ४७० ९८
जळगाव ६३९ ६२७ ९८
कोल्हापूर ७०५ ६१२ ९८
कराड (सातारा) ५७० ५५८ ९८
पाडेगाव (सातारा) ३६० ३५२ ९८
सोलापूर ५४३ ५३२ ९८
राहुरी ४०६ ३९७ ९८
पुणे ५६६ ५५४ ९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com