राज्यात आॅगस्टमध्ये १७ टक्के अधिक पाऊस

पुणे ः आॅगस्टअखेर राज्यात सरासरीच्या ८२४.५ पैकी ९६१.६ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक पाऊस झालाअसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः यंदा राज्यात वेळेवर मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला, तर विदर्भात काही प्रमाणात पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. आॅगस्टअखेर राज्यात सरासरीच्या ८२४.५ पैकी ९६१.६ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. या कालावधीत नगर जिल्ह्यात सर्वाधिक तर अकोला व यवतमाळमध्ये सर्वांत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

अशी होती पावसाची स्थिती  राज्यात १ जूनला मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर हळूहळू मॉन्सूनने वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापले. यंदा जून, जुलैमध्ये कमी - अधिक प्रमाणात पाऊस झाला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती होती. मात्र २ आॅगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले होते.४ आॅगस्टपासून प्रत्यक्षात धुव्वाधार पाऊस बरसण्यास सुरूवात झाली. ५ आॅगस्टला पालघर येथे हंगामातील सर्वाधिक ४६०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत राहिला. एकंदरीत जून, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्टमध्ये अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते.

कोकणात सर्वाधिक पाऊस मॉन्सूनच्या सुरुवातील कोकणातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. गेल्या तीन महिन्यांत कोकणात सरासरीच्या २५१६.८ मिलिमीटरपैकी ३२०१. १ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत २७ टक्के अधिक पाऊस कोकणात झाला आहे. आॅगस्टमध्ये कोकणातील पालघर रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडला. मुंबईत सरासरीच्या १७१६.८ मिलिमीटरच्या तुलनेत २८८२.४ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत ६८ टक्के अधिक पाऊस मुंबईत झाला. आॅगस्टमध्ये पालघरमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १७७ टक्के पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उणे १३ टक्के कमी पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातही जोरदार हजेरी  मध्य महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यात पावसाचा जोर कमी होता. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. घाटमाथ्यावर पावसाचा जोर नसल्याने बहुतांशी धरणे जुलै अखेरपर्यंत कोरडी होती. एकूण तीन महिन्यांच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ५९४.९ मिलिमीटरपैकी ७७७.२ म्हणजेच ३१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. यात नगरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नंदुरबार, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. नाशिकमध्ये सर्वाधिक १६२ टक्के पाऊस झाला. नगर, धुळे, सांगली, सोलापूरमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहिले. जोरदार पावसामुळे गंगापूर, दारणा, कोयना, राधानगरी, खडकवासला, भंडारदरा, मुळा, उजनी, भाटघर आदी धरणे भरून वाहू लागली. या पावसामुळे भात पिकाला देखील चांगला दिलासा मिळाला.      

मराठवाड्यात २२ टक्के अधिक पाऊस सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाला. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी मराठवाड्यातील धरणांमधील पाणी पातळी खालावलेलीच होती. गेल्या तीन महिन्यांत मराठवाड्यात सरासरीच्या ५०३.६ मिलिमीटरपैकी ६१६.८ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत २२ टक्के अधिक पाऊस मराठवाड्यात झाला आहे. औरंगाबादमध्ये ७५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नांदेडमध्ये उणे तीन टक्के तर परभणीत उणे एक टक्के कमी पाऊस पडला.  आॅगस्ट महिन्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले.  

विदर्भात पावसाची हुलकावणीच विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने आॅगस्टमध्ये अनेक भागांना हुलकावणी दिल्याचे चित्र राहिले.  जून, जुलैमध्ये विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला होता. एक ते ३१ आॅगस्ट या कालावधीत विदर्भात सरासरीच्या ७८४.३ मिलिमीटरपैकी ७३०.८ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत उणे ७ टक्के कमी पाऊस पडला. यामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी ५७२.० मिलिमीटरपैकी ८५९.६ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत १४ टक्के अधिक पाऊस या जिल्ह्यात झाला. वाशिम, नागपूर, गोंदिया, बुलडाणा जिल्ह्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळमध्ये आॅगस्टमध्ये कमी पाऊस झाला. आॅगस्टमध्ये विदर्भात पावसाचे जोर काहीसा कमी राहिला असला तरी शेवटच्या टप्प्यात पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.    

एक जून ते ३१ आॅगस्टअखेर जिल्हानिहाय  झालेला पाऊस(मिमी) ः (स्त्रोत - हवामान विभाग)
विभाग    सरासरी पाऊस प्रत्यक्ष पडलेला पाऊस पावसाची  तफावत, टक्के
पालघर   १९८६.६ २३९७.४  २१
रायगड   ७३६.६ ३२३०.३ १८
रत्नागिरी २३०१.०   ३५४८.७ २७
सिंधुदूर्ग   २६१२.९ ३५४८.७ ४३
ठाणे   २०९५.६ २५१०.१ २०
नगर ३०१.१   ५४२.६ ८०
धुळे     ४२५.६    ६४७.७ ५२
जळगाव ५०९.०   ६३८.० २५
कोल्हापूर   १५३४.३ १८६८.५ २२
नंदुरबार      ७१३.७ ७८०.७
नाशिक    ७५०.३ ८९६.६   १९
पुणे  ७०५.१ १०१५.५ ४४
सांगली    ३७५.९   ४७४.२ २६
सातारा ७२६.१  ७७५.५   ७
सोलापूर    ३०४.८ ४५४.५  ४९
औरंगाबाद ४३१.३   ७५३.७   ७५
बीड   ३९४.१ ५८०.१ ४७
हिंगोली   ६४०.६   ६४८.२
जालना ४६१.३ ६४४.७ ४०
नांदेड     ६४६.९ ६२७.४ उणे ३
लातूर    ५२५.१ ५७९.६   १०
उस्मानाबाद ४१८.४ ४८०.१  १५
परभणी    ५९२.२  ५८९.२ उणे १
अकोला     ५७५.७ ४२५.४ उणे २६
अमरावती  ७०८.५ ५७१.५   उणे १९
भंडारा ९५९.५    १०५१.७ १०
बुलडाणा ५३८.९ ५६७.१  ५
चंद्रपूर  ९०३.५    ७९४.४ उणे १२
गडचिरोली १०६५.४ ९९८.२ उणे ६
 गोंदिया     १०२१.६ १०४२.४  २
नागपूर   ७५२.०   ८५९.६ १४
वर्धा   ७१९.३   ६७०.५    उणे ७
वाशिम    ६४६.१      ७१८.६     ११
यवतमाळ ६७४.३ ४९७.१ उणे २६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com