सोलापुरात सुमारे दहा हजार एकर कांदा शिवारातच

दरवर्षी या हंगामात मी कांदा करतो. यावर्षीही दोन एकर कांदा आहे. सध्या तो काढणीला आला आहे. यंदा चांगला भाव मिळेल आणि शेतीला भांडवल मिळेल, जादा पैसे मिळाले तर घर बांधायला काढू, असा विचार केला होता. पण बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता हे शक्य वाटत नाही. दरवर्षी काही ना काही आपत्ती आमच्यावर कोसळतेच. -दिनेश शिंदे, कांदा उत्पादक, उळे, जि. सोलापूर.
उळे येथील दिनेश शिंदे यांचा कांदा काढणीस आला आहे.
उळे येथील दिनेश शिंदे यांचा कांदा काढणीस आला आहे.

सोलापूर ः ‘कोरोना’मुळे गेल्या आठवडाभरापासून सोलापुरातील कांद्याचे लिलाव बंद आहेत. येत्या मंगळवारपर्यंत (ता.१४) ते बंद असणार आहेत. पण त्यानंतरही ते सुरु राहतील का, याबाबत साशंकता आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला आहे. अनेकांचा कांदा काढणीस आला आहे. एरव्ही, व्यापारी बांधावर येत होते, पण तेही आता फिरकत नाहीत. तसेच बाजारही बंद असल्याने डोळ्यासमोर कांद्याचे नुकसान पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आजही जिल्ह्यातील शेतशिवारात दहा हजारांहून अधिक एकरवर कांदा पडून आहे. 

नाशिक, नगरपाठोपाठ सर्वाधिक कांद्याचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. जेमतेम पाऊस झाल्याने जिल्ह्यात सगळीकडे उन्हाळी कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. या हंगामात दरवर्षी १५ ते २० हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर कांदा होतो. त्यापैकी सध्या जवळपास ४० टक्के कांद्याची काढणी पूर्ण झाली आहे. पण आजही जवळपास ६० टक्के कांदा शेतशिवारात पडून आहे. काही शेतकऱ्यांकडील कांदा  आठ-दहा दिवसांत काढणीला येणार आहे, तर काहींनी काढून ठेवला आहे.

या सगळ्यांना कांदा बाजारात कधी जातो आणि किती दर मिळतो, याची चिंता लागली आहे. जिल्ह्यात बहुतेक सर्व भागात कांदा होतोच, पण त्यातही करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ हा कांदापट्टा मानला जातो. वर्षभर अन्य पिकांतून काही उत्पन्न नाही मिळाले, तरी उशिराच्या रब्बी किंवा उन्हाळी कांद्यातून हमखास उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने या भागातील शेतकरी सर्रास कांदा उत्पादन घेतात. पण यंदा ‘कोरोना’मुळे त्यांच्यावर आर्थिक आपत्ती कोसळली आहे. 

सध्या अनेक शिवारात कांदा काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. अनेक शेतकरी घरच्या घरी कांदा काढत आहेत. कांदा काढणी थांबवावी; तर पात वाळून गेल्यानंतर पुन्हा काढायला जिकिरीचे आहे. त्यामुळे तो तसा ठेवता येत नाही. त्यामुळे काढून तो शिवारातच मोकळा टाकला जात आहे. विशेष म्हणजे कांदा साठवणुकीसाठी जिल्ह्यात ५ टक्के शेतकऱ्यांकडेही कांदाचाळी नाहीत.   

‘कोरोना’मुळे लॅाकडाउन करण्यात आल्याने बहुतेक सर्व बाजारपेठा बंद आहेत. आता १४ एप्रिलनंतर बाजार सुरु होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. पण मागणी वाढणार आहे, हेही वास्तव आहे. दुसरीकडे एकाचवेळी कांदा बाजारात आला, तर व्यापारी दर पाडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. 

कांद्याचे एकरी किमान १०० क्विंटल उत्पादन आणि प्रतिक्विंटल सरासरी एक हजार रुपये दर जरी गृहित धरल्यास दीड लाख रुपये होतात. जिल्ह्यातील १० हजार एकर शिल्लक क्षेत्र धरल्यास किमान दीडशे कोटींहून अधिक रुपये होतात. जर योग्य दर मिळाला नाही किंवा सरसकट कांद्याचे नुकसान झाल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांचे संकल्प विरले  कांद्याला चार पैसे मिळाले तर यंदा कुणी घर बांधण्याचा संकल्प केला होता, कुणाला मुलीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करायची होती, कुणाला बँकांचे हप्ते संपवायचे होते, तर कोणाला मुलांच्या शिक्षणाचा भार कमी करायचा होता; तर कोणाला पुढील हंगामातील भांडवल तयार करायचे होते. पण ‘कोरोना’मुळे हे सर्व संकल्प आपत्तीमध्ये विरून गेले आहेत.  

गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने या हंगामात मी कांदा पिक घेतो. सध्या दोन एकर कांदा आहे. यंदा ‘कोरोना’मुळे सगळीच अडचण होऊन बसली आहे. साठवायलाही आमच्याकडे कांदाचाळ नाही. लॅाकडाउनमुळे बेभरवसा होऊन बसला असल्याचे कारंबा येथील कांदा उत्पादक  आकाश आदाटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com