कर्जबाजारीपणाने हैराण शेतकऱ्याची ‘मातोश्री’वर धडक

बँकेने माझ्यावर आठ-आठ लाखांचे कर्ज दाखवले. ही सर्व कर्जे खोटी आहेत. रायगड पोलिसांनीही माझी तक्रार घेतली नाही. त्यामुळे मी राज्यपालांकडे पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला. वर्षा बंगल्यावर गेलो होतो. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसल्याने मातोश्रीवर आलो. पण, पोलिसांनी मला भेटू दिले नाही. उलट पोलिस स्टेशनला नेऊन कुर्ल्याला आणून सोडले. - श्री. देशमुख, शेतकरी
कर्जबाजारीपणाने हैराण शेतकऱ्याची ‘मातोश्री’वर धडक
कर्जबाजारीपणाने हैराण शेतकऱ्याची ‘मातोश्री’वर धडक

मुंबई  : बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी रविवारी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अडवून पोलिस ठाण्यात नेले.  दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याला सोडून देण्याचे व त्यांचे काय काम आहे, त्याची विचारपूस करण्याचेही आदेश दिले आहेत.

या शेतकऱ्याचे नाव देशमुख असे असून, ते पनवेलहून मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षांची मुलगीही होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर उभे राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये जाऊ देण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी थेट मातोश्रीतच प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी देशमुख यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी देशमुख आणि त्यांच्या कन्येला धक्काबुक्की केली. तेव्हा मला मुख्यमंत्र्यांना भेटू द्या, मला ठार मारणार आहात का? असा सवाल देशमुख यांनी पोलिसांना केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू न देता त्यांची रवानगी खेरवाडी पोलिस ठाण्यात केली. 

देशमुख यांनी सोबत एक फाईलही आणली होती. बँकेच्या कर्जासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी थेट मातोश्रीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज मातोश्रीवर येत असतात. त्यामुळे या लोकांशी असे वागावेच लागते, अशी सारवासारव पोलिसांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या शेतकऱ्याला सोडून देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com