सांगली जिल्ह्यात मृग बहारातील डाळिंब हंगाम आटोपला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः जिल्ह्यात नैसर्गिक संकटातून वाचलेल्या मृग बहारातील डाळिंबाचा सुमारे ८० टक्के हंगाम संपला असून, यंदाचा हंगाम दीड महिना अगोदर आटोपला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर कमी मिळाला; तसेच डाळिंब उत्पादनातही पन्नास टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात प्रामुख्याने डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. या हंगामात डाळिंबाला चांगले दर मिळतात. गतवर्षी पाण्याची कमतरता होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविल्या. जून महिन्यात पाण्याची उपलब्धतेनुसार मृग बहारातील डाळिंबाचे शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. सुरुवातीच्या काळात डाळिंबाचे पिक चांगले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते; परंतु डाळिंबाला पाणी कमी पडत असल्याने शेतकऱ्यांनी शेततळ्यात पाणी साठवणूक करुन पिकासाठी गरजेनुसार पाण्याची सोय केली.

मात्र, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पट्ट्यात परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. त्याचा परिमाण बागांवर होऊन फुलगळ झाली. अनेक ठिकाणी फळे लागली होती, ती कुजली. त्याबरोबर काही प्रमाणात तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिमाणी, डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली. 

मृग बहारातील डाळिंबाची विक्री मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होते; परंतु डाळिंब पिकावर नैसर्गिक संकट आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे डाळिंब हंगाम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दीड महिना अगोदर हंगाम संपला.

शेतकरी संकटात गेल्या वर्षी डाळिंब पिकास पोषक हवामान होते. रोगांचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. एकरी सरासरी १८ टन उत्पादन मिळाले होते. बाजारपेठेत डाळिंबाला मागणी होती. त्यामुळे गतवर्षी स्थानिक बाजारपेठेत ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असा दर डाळिंबाला मिळाला होता. यंदा डाळिंबाचे उत्पादन घटणार असल्याने दरात वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दरात वाढ झाली नाही. डाळिंबाला ४० ते ५० रुपये किलो दर मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

असा राहिला हंगाम

  • उत्पादनात पन्नास टक्के घट
  • दर्जेदार फळे नसल्याने निर्यात थांबली
  • जिल्ह्यातून २० टक्के निर्यात शक्य
  • निर्यातक्षम डाळिंबाचे दर १०० ते ११० रुपये प्रतिकिलो
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com