यंदा ३० कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचा `पणन`चा प्रस्ताव

नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात गेल्या हंगामात (२०१९-२०) ९२ केंद्रांच्या माध्यमातून विक्रमी कापूस खरेदी केली होती. यंदा (२०२०-२१) मनुष्यबळाअभावी राज्यात केवळ ३० केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाने ठेवला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात गेल्या हंगामात (२०१९-२०) ९२ केंद्रांच्या माध्यमातून विक्रमी कापूस खरेदी केली होती. यंदा (२०२०-२१) मनुष्यबळाअभावी राज्यात केवळ ३० केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाने ठेवला आहे. 

भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) एजंट म्हणून कमिशन तत्त्वावर राज्यात राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने गेल्या हंगामात कापसाची खरेदी केली. त्यासाठी ९२ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. सुमारे १८० जिनिंगच्या माध्यमातून ९९.८२ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ५०२३ कोटी रुपयांपैकी सद्यःस्थितीत कापूस चुकाऱ्याचे १७० कोटी रुपये थकीत आहेत. शासनाने नुकतीच चुकाऱ्याच्या रकमेकरिता बँक हमी घेतली. परिणामी पैशांची व्यवस्था झाल्याने पणन महासंघ कापूस उत्पादकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत रक्कम जमा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, गेल्या हंगामात जास्तीत जास्त केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पणन महासंघाला प्रत्यक्ष खरेदीच्यावेळी मात्र अपुऱ्या कर्मचारीवर्गा अभावी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यावर पर्याय म्हणून कृषी विभागाचे ९२ कर्मचारी ग्रेडर म्हणून विविध केंद्रांवर नियुक्त करण्यात आले. परंतु, हा सक्षम पर्याय नसल्याचे सांगत पणन महासंघाने येत्या हंगामात केवळ तीस केंद्रांच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त ५० जिनिंगमध्ये ही खरेदी होईल.

सध्या पणन महासंघाकडे ६२ ग्रेडर आहेत. आजारपण व इतर कारणांमुळे अनेक जण कामावर उपस्थित राहत नाहीत. परिणामी केवळ ५० ग्रेडरच्या भरवशावर कापूस खरेदी करावी लागते. ही स्थिती महासंघाने थेट सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. 

‘पणन’ची नियोजनाबाबत बैठक पणन महासंघाने या वर्षीच्या हंगामात केवळ ३० खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मोक्याच्या आणि सुविधायुक्त खरेदी केंद्रांना ‘सीसीआय’ कडून प्राधान्य दिले जाते असाही आक्षेप आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी `सीसीआय’’ आणि पणन महासंघात गुरुवारी (ता. ३) मुंबईत बैठक होणार आहे.  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर शुक्रवारी (ता.४) जळगाव येथे पणन महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, असे सांगण्यात आले. या बैठकीत येत्या हंगामातील खरेदीचे नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

प्रतिक्रिया  राज्यात मागील हंगामात विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पणन महासंघाच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे येत्या हंगामात केवळ तीस केंद्रे आणि ५० जिनिंग सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. गुरुवारी (ता. ३) आणि शुक्रवारी (ता. ४)  होणाऱ्या बैठकीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com