पॉलिहाउसच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह कायम

पॉलिहाउस उभारणीसाठी ८४२ ते ९३५ स्केअर मीटर; तर शेडनेटसाठी ५०३ ते ६०१ रुपये स्केअर मीटर असा खर्च गृहित धरला आहे. याशिवाय इतर खर्चही गृहित धरला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा हा झालेला खर्च गृहित धरून नुकसानभरपाई देता येऊ शकते का, याचा विचार होण्याची गरज आहे. त्यासाठी शासनपातळीवर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. - शिरीष जमधडे, संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान गृहित धरण्याचे निकष सरकारने जाहीर केलेले आहेत. मात्र, त्यामध्ये पॉलिहाउस व शेडनेटच्या नुकसानापोटी मदतीबाबतचा उल्लेख नाही. जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या पॉलिहाउस, शेडनेटच्या नुकसानाबाबत जिल्हा कृषी कार्यालयाकडून आलेल्या एकूण नुकसानाच्या रकमेवरच सरकारला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती भरपाई मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

पाऊस व वादळामुळे यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पॉलिहाउस व शेडनेडचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यांचे पंचनामे न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले होते. नुकत्याच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कशी धरायची, त्यात नुकसानाचा अहवाल देताना हा १०० टक्के, ८० टक्के की ५० टक्के नुकसान गृहित धरून द्यायचा किंवा कसे, असे प्रश्न कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आहेत. त्यासंबंधी अधिकाऱ्यांमध्ये मतमतांतरे दिसून आली आहेत.

विशेष म्हणजे कृषी विभागाकडून एकूण समोर आलेल्या नुकसानाच्या रकमेचा अहवाल शासन मान्य करणार की नाही, हासुद्धा वेगळा मुद्दा आहे. कारण सद्यःस्थितीत शासनाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध योजनांचा निधी कमी केला असून, अनावश्यक खर्च कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार की नाही, असे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.

याबाबत विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे म्हणाले, की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे चौकशी करून प्रत्यक्षात किती नुकसान झाले, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानुसार शासनाला अहवाल पाठवून नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. यामध्ये नुकसान झालेल्या पॉलिथिलीन पेपरला शंभर टक्के, सांगाड्यासाठी २० ते ८० टक्के; तर काहींना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. याशिवाय नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई द्यावी लागणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल म्हणाले, की पॉलिहाउसच्या नुकसानाची रक्कम काढणे हा मोठा अडचणीचा प्रश्न आहे. तरीही आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानाच्या रकमेचा अहवाल पाठविणार आहे. त्यामध्ये कोणत्या घटकाचे किती नुकसान झाले, याची माहिती नमूद करणार आहोत. 

यापूर्वी पॉलिहाउस उभारणीसाठी किती खर्च येतो, याचे मापदंड ठरवण्यासाठी कृषी विभागाने एक समिती नेमली होती. वादळामुळे नुकसान झालेल्या पॉलिहाउस सांगाड्याचे बहुतांशी पाईप दुरुस्त करता येतात. ज्या ठिकाणी पाईपचे अतिनुकसान झालेले आहे, तेथील एखादा दुसरा पाइप बदलावा लागतो. त्यासाठी फारसा खर्च येत नाही. त्यामुळे सांगड्याची नुकसानभरपाई काढण्यासाठी पुन्हा कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची एखादी समिती नेमावी लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com