नगर जिल्ह्यात पाऊण लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात रब्बीत आतापर्यंत सुमारे ७५ हजार ६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यंदा असलेली पाण्याची उपलब्धता तसेच सध्या बाजारातील दराचा विचार करता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कांद्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून कांद्याचे क्षेत्र वाढत असून रब्बी हंगामात सुमारे ८० ते ९० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. गेल्यावर्षी दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जेथे काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाले तेथे कांदा लागवडीला प्राधान्य दिले गेले. २०१८ मध्ये पाणी उपलब्धता अधिक असल्याने कांद्याचे क्षेत्र वाढले होते. यंदा मात्र खरिपात फारशी कांदा लागवड झालेली नाही. त्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे कांदा सडला.

आता रब्बी साठी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहे. शिवाय गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली. यामुळे कांदा दर वाढले आहेत. त्याचाही यंदाच्या रब्बीमधील कांदा लागवडीवर परिणाम दिसणार आहे. अजून कांदा लागवडीचे काम सुरू आहे. यामुळे रब्बीत कांद्याचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत ७५ हजार ६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून सर्वाधिक क्षेत्र पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांत आहे. राहाता, अकोल्यात क्षेत्र अल्प आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कांदा लागवडीचे मात्र क्षेत्र कृषी विभागाकडेच उपलब्ध नाही. 

यंदाचे लागवड क्षेत्र (हेक्टर) ः नगर ः ७७८६, पारनेर ः २४,८२८, श्रीगोंदा ः १४,२१३, कर्जत ः ७३८३, जामखेड ः २६१५, शेवगाव ः १४३३, पाथर्डी ः ५८१२, नेवासा ः २९४९, राहुरी ः ३०६१, संगमनेर ः ४२४२, अकोले ः ५८०, कोपरगाव ः २८१६, राहाता ः ३०८. 

तीन वर्षांतील कांदा लागवड (हेक्टर) 
२०१७-१८ ९२ हजार ९०२
२०१८-१९ ७३ हजार ८८१
२०१९-२० ७५ हजार ०६६  (८ डिसेंबरपर्यंत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com