कृषी सहायकांनी आठवड्यातील तीन दिवस गावात जायलाच हवे : कृषिमंत्री दादा भुसे

कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एकच नमुना असा तयार करावा, की ज्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे मागावी लागणार नाहीत. — दादा भुसे, कृषिमंत्री
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

अकोला  : राज्यात कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता गावांमध्ये जावे. फोटो काढण्यासाठी काम करू नये. आज कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मोजकेच शेतकरी घेतात. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना आपल्या विभागाशी कसे जोडता येईल, यावर खूप काम करावे लागेल. यासाठी कृषी सहायकांनी आठवड्यात किमान तीन दिवस गावात गेलेच पाहिजे. कृषी विभागाचे कर्मचारी आमच्या गावात येऊन योजनांची माहिती देतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. आमदार नितीन देशमुख, ‘पोकरा’चे संचालक गणेश पाटील, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, प्रगतिशील शेतकरी गणेश काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ आदी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी श्री. भुसे म्हणाले, की कृषी विभागाच्या योजनांचा फापट पसारा आपण कमी करणार आहोत. कामांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. कृषी विभागात चांगले काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या कृषीसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात टेबल खुर्ची मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

या वेळी सुभाष नागरे यांनी प्रास्ताविकात विभागातील कृषीविषयक योजना, पीकपद्धतीची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी माहितीचे सादरीकरण केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com