नदीजोड प्रकल्पाला लवकरच मान्यता : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

अहवालानुसार नदीजोड प्रकल्पातून गोदावरी खोऱ्यातील नाशिक, जळगाव, नगरसह मराठवाड्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे. — जयंत पाटील, जलसंपदामंत्री
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : गोदावरी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तसेच गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी वळवण्यासाठीच्या योजनांना तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. यातील प्रकल्प अहवालाच्या अंदाजपत्रकास लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. तसेच या योजनांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यास समितींच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल,  असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

नदीजोड प्रकल्पांतर्गत मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्‍न मंगळवारी (ता. ३) विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी विचारला होता. या प्रश्‍नावर उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, की पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्याला वळवण्यासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे.

त्यात नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हासनदी या खोऱ्यांतून ८९. ८५ अब्ज घनफूट पाणी मराठवाड्यात वळवण्याबाबतची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, ऊर्ध्व वैतरणा ते गोदावरी नदीजोड योजनांचे प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आले आहेत. तसेच ६१.८८ अब्ज घनफूट पाणी वळवण्याबाबतच्या योजनांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुरेश धस, भाई जयंत पाटील, शरद रणपिसे, विनायक मेटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com