राज्यातील प्रकल्पांमध्ये ७६ टक्के पाणीसाठा

पुणे ःदमदार पावसामुळेधरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. सोमवारअखेर (ता.३१) राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या मिळून ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जून, जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिली होती. मात्र त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. सोमवारअखेर (ता.३१) राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या मिळून ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जून, जुलै अखेर पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा धरणे भरतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. मात्र, आॅगस्ट महिन्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा १३ टक्के अधिक पाणीसाठा यंदा जून आणि जुलैमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आॅगस्टमध्ये बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत होते. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. सध्या राज्यातील धरणांमध्ये ७६.९८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. 

गतवर्षी होता ६३ टक्के पाणीसाठा  गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला होता. मात्र, सप्टेंबर आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणे भरली. यामुळे उन्हाळ्यात तुलनेने कमी प्रमाणात पाणीटंचाई भासली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यांतील सर्व धरणांमध्ये मिळून ६३.९८ टक्के पाणीसाठा होता. चालू वर्षी ३१ आॅगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश धरणांमध्ये तुलनेने चांगला पाणीसाठा झाला आहे.

पावसाचे जून, जुलै अशी दोन उलटले तरी, मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मराठवाडा धरणांनी तळ गाठला होता. आॅगस्टमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. परिणामी धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. मराठवाड्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून सध्या ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीत मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये अवघा २९.८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३४ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये सध्या १६६ टीएमसी म्हणजेच ६३.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे.  

राज्यातील बहुतांश भागातील लघू  आणि मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प भरले असून विसर्गही काही प्रमाणात सुरू आहे. राज्यात २५८ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी या कालावधीत ४५.८१ टक्के पाणीसाठा होता. या प्रकल्पांमध्ये सध्या १३०.८२ टीएमसी म्हणजेच ६८.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्यात २८६८ लघू प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत या प्रकल्पांमध्ये २५.३५ टक्के पाणीसाठा होता. यंदा आत्तापर्यंत या प्रकल्पांमध्ये ७९.८६ टीएमसी म्हणजेच ३५.३१ टक्के पाणीसाठा झाला आहे.        शंभर टक्के भरलेले प्रकल्प  येलदरी, धारणी, कवडास उ. बंधारा, निम्न चोंडे, असोलामेंढा, तोतलाडोह, भंडारदरा, कडवा, भाम, भावली, तुळशी, दुधगंगा, चासकमान, वडज, भाटघर, पानशेत, निरा देवधर, वरसगाव, खडकवासला, उरमोडी, वीर, बारवी, मुळशी टाटा.    

आॅगस्टअखेर धरणांमधील पाणीसाठा (टीएमसी)
विभाग   पाणीसाठा टक्के
अमरावती १०२.०२  ६८.९१
कोकण १०१.११  ८१.५९
औरंगाबाद १६६.५०  ६३.९७
नागपूर  १२८.११ ७८.७७
नाशिक  १५४.९८ ७२.९५
पुणे ४५९.१७ ८५.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com