आम्हा ओढ भाकरीची; आमचं कुठलं आलंय पॅकेज : अल्प भूधारक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

सांगली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेती, शेतकरी अशा सर्वांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा सध्या जोरदार बोलबाला आहे. मात्र १० गुंठ्यापासून अर्धा एकरापर्यंत जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणारे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. चिपट्या मापट्याने आपला शेतीमाल गावच्या बाजारात विकून आपल्या कुटुंबाच्या भाकरीची तजवीज करणारे शेतकरी या पॅकेजमध्ये कुठे असणार आहेत हा प्रश्न कायम आहे. सध्या बाजारात जाऊन शेतीमाल विकणे थांबल्याने या वर्गाचे पोटाला चिमटे काढणे सुरू आहे. कोणत्याही पॅकेजचा गवगवा यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने या वर्गाला पॅकेजचं देणं-घेणं नाही, अशी स्थिती आहे. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विकायला व्यापारी नेमले असून त्यांचा व्यवसाय मात्र सुरु आहे. तो ही या वर्गाकडून मातीमोल दराने शेतमाल खरेदी करूनच.
संग्रहित छायाचित्र

२१ मार्चपासून देश लॉकडाउन आहे. या दरम्यान उद्योग, व्यवसाय, दळणवळण ठप्प झाले आहे. यात एकच घटक राबतोय तो म्हणजे शेतकरी. त्याने पिकवलेला माल शहरात विक्रीला जातोय पण तो बहुतांश व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच. काही ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी थेट विक्रीचे प्रयोग केलेत पण तेही तोकडेच. दर आठवड्यातून एकदा-दोनदा पाटी, डालगं, बुट्ट, पिशवीतून आपला शेतमाल विकायला घेऊन जाणाऱ्यांचा बाजार मात्र बंद पडला आहे. आजघडीला काही जिल्ह्यांतील नियम थोडे शिथिल झाले असले तरी अशा बाजारांना मात्र कोठेही परवानगी नाही.

जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणांसह मोठ्या गावात आठवडी बाजार भरतात. या बाजारात छोटे शेतकरी कडधान्ये, धान्य, विविध प्रकारच्या डाळी, हंगामी फळे, मेथी, कोथिंबीर, करडई, घोळ असा भाजीपाला, अंडी, कोंबडी, वर्षात एखाद-दुसरे शेळीचे-मेंढीचे करडू विक्रीला घेऊन जातात. मापट्या - चिपट्याने, पेंढीने, डझनाने, तागडीत जोकूनवर वजनाला भारी करून अशी माल विक्री होत असते. तसेच बागायतदारांकडून शेतीमाल विकत घेऊन माळवं विकायला बाजारात आणणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

या शेतकऱ्यांचे अर्थकारण आठवडे बाजारांभोवतीच फिरतंय. आता हे बाजारचं थांबल्याने यांचे भाकरीचे गणित कोलमडले आहे. बाजारात सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून दिवसाकाठी अडीचशे ते पाचशे रुपयांपर्यंत कमाई होते. या तुटपुंज्या कमाईवरच त्यांची गुजराण होत असते.

या एवढ्याशा बाजाराकरिता सुद्धा खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शेतीमाल खरेदी करून विकायला आणणारा वर्गही मोठा आहे. हे सावकार या शेतकऱ्यांना दहा टक्क्यांपर्यंत व्याज आकारतात. आता या कर्जाची सरकार दरबारी नोंद नसेल, त्यामुळे इथे कुठल्या पॅकेजचे निशाण असणार नाही. तातडीने ‘कोरोना’ संपावा आणि बाजार पुन्हा सुरु व्हावा, अशी माफक अपेक्षा या वर्गाची आहे. सरकार या वर्गाला कोणत्यातरी पॅकेजमध्ये समाविष्ट करेल का हा प्रश्न मात्र कायमच राहतो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com