प्रशासकीय कामकाजावरून विधानसभा अध्यक्ष संतापले...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई  : विधिमंडळातील कामकाजाबाबत प्रशासकीय अधिकारी गांभीर्य दाखवत नसल्याने सोमवारी (ता. २) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा पारा चांगलाच चढला. या वेळी रागाच्या भरात नाना पटोले यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना विधानसभेच्या प्रवेशद्वारावर येऊन माफी मागण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना थेट अशी शिक्षा सुनावण्याची विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते चांगलेच हादरले. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना विनंती केल्यानंतर ही शिक्षा मागे घेण्यात आली.  

विधानसभेत मागील अधिवेशनात ८३ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यातील केवळ ४ मुद्यांना प्रशासनाने उत्तर दिले आहे. नियमानुसार औचित्याच्या मुद्यांना एका महिन्यात उत्तर द्यावे लागते. या दिरंगाईबद्दल विधिमंडळ प्रशासन वारंवार पाठपुरावा करत होते. विधानसभा अध्यक्षांनीही मुख्य सचिवांना फोन करून याची कल्पना दिली होती. मात्र तरीही उत्तरे मिळत नसल्याने अध्यक्ष नाना पटोले चिडले आणि त्यांनी थेट मुख्य सचिवांना शिक्षा सुनावली. 

अध्यक्षांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना ही शिक्षा मागे घेण्याची विनंती केली. याबाबत श्री. पवार म्हणाले, की प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल मी उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात असे घडणार नाही, याची मी खात्री देतो.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्षा मागे घ्या, अशी विनंती अध्यक्षांना केली.   ‘...तर मुख्य सचिवांनाच जबाबदार धरेन’ सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसेल तर कडक भूमिका घेणे भाग असते. तहसीलदार, ठाणेदारही आमदारांचा मान ठेवत नाहीत. या पद्धतीने प्रशासनाची वागणूक असेल आणि आमदारांच्या तक्रारी आल्या तर मी यापुढे मुख्य सचिवांनाच जबाबदार धरेन. मी जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत हा अपमान सहन करणार नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना सुनावलेली शिक्षा मागे घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com