चंद्रपूर जिल्ह्यात पीककर्ज वितरणात बॅंका पिछाडीवर

राज्यात ‘कोरोना’मुळे बॅंक व्यवहारासाठी दोन ते तीन तास इतकाच कालावधी होता. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र ३०१ बॅंकांच्या शाखा पूर्णवेळ ग्राहकांच्या सेवेत होत्या. त्यामाध्यमातून बॅंक व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आताही पूर्णवेळ बॅंका सुरु असल्या तरी बॅंक शाखेपर्यंत पोचणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने पीककर्ज वितरणाला अपेक्षित गती आलेली नाही. - शंभुनाथ झा, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, चंद्रपूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर  ः चंद्रपूर जिल्ह्यातील बॅंका खरीप पीककर्ज वितरणात पिछाडीवर आहेत. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना बॅंकांपर्यंत पोचण्यास अडचणी येत असल्यामुळे पीककर्ज वितरणाची ही स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात खरिपासाठी एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून मे अखेरपर्यंत केवळ २८६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण झाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत. गडचिरोलीशी जिल्ह्याच्या सीमा जुळलेल्या असल्याने या भागातही नक्षलवाद्यांचा वावर असतो. त्यामुळे चंद्रपूर देखील नक्षलप्रवण जिल्हा आहे. या भागात धानाचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे पीककर्जही मर्यादित राहते. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात ९८० कोटी रुपयांचे पीककर्जाचे उद्दिष्ट खासगी, राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकांना होते. यापैकी ५१६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.

यावर्षीच्या खरिपाकरिता १ हजार कोटीचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात त्यापैकी केवळ २३ कोटी २९ लाख रुपयांचे कर्ज वितरण  झाले. आता हा आकडा २८६ कोटींवर पोचला आहे.  खरीप हंगाम काही दिवसांवर आला असतानाही बॅंकांनी मात्र कर्ज वितरणात हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता खासगी सावकारांवरच आहे. 

मी नियमित कर्जदार असल्याने मला भारतीय स्टेट बॅंकेकडून कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण आली नाही. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करून माझ्या कर्ज खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. दरवर्षी मी असाच अनुभव घेतो, असे चारगाव (ता. वरोरा) येथील शेतकरी  मधुकर भलमे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com