पुणे विभागात उन्हाळी पिकांचा १३ हजार हेक्टरवर पेरा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः शेतकऱ्यांनी आता उन्हाळी पिकांच्या पेरण्यांवर भर दिला आहे. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने अनेक भागात उन्हाळी पेरण्या वेगात सुरू आहेत. उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र २४ हजार २ हेक्टर असून त्यापैकी १२ हजार ८९९ हेक्टरवर म्हणजेच ५४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस व कीड-रोग, प्रतिकूल हवामानाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. परंतू, अतिपावसामुळे भूजल पातळी अजूनही चांगली आहे. त्यामुळे उन्हाळी पेरण्यांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पाण्याची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. विभागात उन्हाळी मक्याची चार हजार ३०७, बाजरीची एक हजार ४३४, उन्हाळी मुगाची ६६६, उन्हाळी भुईमुगाची सहा हजार ३५३, उन्हाळी सूर्यफुलाची ४९ तसेच गळीतधान्याची ९० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

विभागात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांच्या उत्पादनाकडे वळू लागले आहेत. नगर जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग या पिकांची अल्प प्रमाणात पेरणी झाली असून पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. नेवासा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर, राहुरी या तालुक्यांत पेरणी झालेली आहे.

पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकाची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. बाजरी, भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मावळ, भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यात पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.  

जिल्हानिहाय झालेली पेरणी ः (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के
नगर ४९५७ ३३७२ ६८
पुणे १२,६६९ २५१९ २०
सोलापूर ६९६० ७००८ १०१
एकूण २४,५८७ १२,८९९ ५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com