भेसळयुक्त बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी : कृषिमंत्री दादा भुसे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीककाढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टिंगचा वापर केला होता. यामुळे महाबीज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबीन वाणाचे बियाणे मिसळले गेले असल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २) विधानसभेत दिली.

दरम्यान, याअनुषंगाने आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर राज्यातही कायदा करण्याबाबत विचार सुरू असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. भुसे बोलत होते.

मंत्री भुसे म्हणाले, कि खाजगी कंपन्याच्या माध्यमातून बियाणे, किटकनाशके यांची भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बियाणांच्या भेसळसंदर्भातील कायदे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, राज्य शासनास त्याप्रमाणे कारवाई करावी लागते. भेसळीसंदर्भातील तक्रारी आल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यरत असून, या समितीस आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत आमदार भारत भालके, सुनिल प्रभु, रणजित कांबळे यांनी सहभाग घेतला.   शेतकऱ्यांना ३५ टक्के नुकसान भरपाई या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ३५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रकमेचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार आहे. सोयाबीन बियाणे एमएयूएस ७१ आणि ६२ यांच्या एकत्रिकरणास जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com