‘कोरोना’ मुळे मुंबईच्या पाहुण्यांची गावखेड्यात धडकी

शहरात गेले तरी गावची नाळ कायम ठेवावी हे कोरोना सारख्या आपत्तीतून स्पष्ट झाले आहे. गाव खेड्यातील शेतकरी माणसं कायमच लोकांना मदत करतात. त्याप्रमाणे आताही शहरातून आलेल्यांना मदत करणे आवश्यक आहे. शहरातून आलेल्या लोकांनीही आपापली काळजी घेत खेड्यातील माणसांना अडचणी निर्माण होतील असे वागू नये. आपली तपासणी आणि विलगीकरण करावे. तुटत चाललेलं नातं पुन्हा दृढ करण्याची ही एक संधी आहे. - डाॅ. दत्तात्रय वने, कृषिभुषण शेतकरी, मानोरी, ता. राहुरी, जि. नगर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 नगर  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वरचेवर वाढत गेला आणि शहरातून येत असलेल्या पाहुण्यांमुळे गावखेड्यात धडकी भरली असल्याचे सध्या राज्यभर चित्र पहायला मिळत आहे. नगरसह राज्यातील अनेक भागांत शहरातून विशेषतः मुंबईतून आलेले पाहुणे कोरोन बाधीत असल्याचे पहायला मिळत असून त्यामुळे ग्रामीण भागात ‘कोरोना’चा शिरकाव झाला आहे. ‘कोरोना’च्या भितीने गावखेडे हतबल झाले आहेत.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आदी मोठ्या शहरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढतच आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त अनेक जण त्या शहरांत स्थायिक झाले. मात्र, ‘कोरोना’च्या धास्तीने आता ते गावाकडे परतत आहेत. त्यातील काही मंडळी तपासणी करून व गावात आल्यानंतर विलगीकरण कक्षात थांबत आहेत. मात्र, काही जण रात्री-अपरात्री चोरवाटांनी गावात येऊन थेट घरी पोचत आहेत. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. ही मंडळी रात्री-अपरात्री येतात कशी? त्यांना कोण आणून सोडते? जिल्ह्याच्या सरहद्दीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व कर्मचारी करतात काय, असे एक ना अनेक प्रश्‍न यातून उपस्थित होत आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून बाहेरून आलेले नागरिकच ‘कोरोना’बाधित आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाहुण्यांना गावाबाहेरच ठेवा, नाही तर त्यांना शहरातच थांबवा, अशी मागणी होत आहे.   जावई माझा भला, पण.... रोजगार, नोकरीच्या निमित्ताने खेडयातील लोक शहरात स्थायिक झाले. काळाच्या ओघात गावांकडे दुर्लक्ष झाले, अनेकांनी गावाकडची शेती, घरदार विकले आणि शहरात स्थायिक झाले. आता कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव वाढल्याने अनेक कित्येक वर्ष गावाकडे फिरकले नसलेलेही गावांत येत आहे. त्यात ज्यांनी गावांकडे रहायला सुविधा नाही त्यांनी सासरवाडी जवळ केली आहे. नगरसह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हेच चित्र आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत चार जावई कोरोनाबाधित निघाले. बीडमध्येही असाच प्रकार उघड झाला. जावई माझा असं म्हणणाऱ्या सासरवाडीची आता सहनही होईना अन् सागंताही येईना अशी अवस्था झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com