विदर्भात उद्या, उर्वरित राज्यात परवापासून पावसाची शक्यता  

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः राज्यात थंडी वाढली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी नगर येथे १०.६ अंश सेल्सिअस अशी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.  उद्या (ता. ६) विदर्भात तर मंगळवारपासून (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुन्हा ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्रावाताची स्थिती आहे, त्यामुळे बहुतांश भागात ढगाळ हवामान आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच मध्य प्रदेश व तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रावातामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार आहे. शनिवारी दिवसभर राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान होते, तसेच अधूनमधून ऊनदेखील पडत होते. उद्या (ता. ६) विदर्भात तर मंगळवारपासून (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुन्हा ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ४) राज्यातील अनेक भागात हवामान ढगाळ असले तरी दुपारनंतर काही प्रमाणात ऊन पडले. तसेच थंडीदेखील वाढली होती. त्यामुळे किमान तापमानात चढउतार दिसून येत होता.  विदर्भात नागपूर परिसरात अनेक भागात थंडी कमी होऊन किमान तापमान वाढले होते. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान असले तरी थंडीत चांगलीच वाढ झाली होती. या भागात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. कोकणातही किचित थंडी वाढली असून किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असून ऊन पडत होते. नगर, निफाड, पुणे येथील किमान तापमानात चांगलीच घट झाली होती.  

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंत असलेले विविध ठिकाणांचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः नगर १०.६, अकोला ११.८, औरंगाबाद १०.७, जळगाव १४.२, कोल्हापूर १५.१, मुंबई १७.५, नागपूर १४.०, नाशिक ११.६, मालेगाव १४.२, निफाड १०.८, परभणी कृषी विद्यापीठ १३.०, पुणे ११.५, रत्नागिरी १६.६, सांगली १३.९, सातारा ११.४, सोलापूर १८.०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com