राज्यात थंडीत घट; चक्राकार वाऱ्याच्या स्थितीने रोखले थंड प्रवाहांना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि परिसरात तसेच मध्य प्रदेशादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे या भागात काही अंशी ढगाळ हवामान आहे. तसेच उत्तरेकडून वाहणारा थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झाला आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत थंडी कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसवर गेला आहे. बुधवारी (ता. १५) सकाळी विदर्भातील येथील गोंदिया आणि नांदेड येथे सर्वांत कमी ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात थंडीचे प्रमाण कमी-जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भासह राज्यातील काही भागांत थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे किमान तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मागील दोन दिवस किमान तापमानात चढउतार सुरू होते. सध्या विदर्भात काही भागांत थंडी असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागांत थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. बहुतांशी भागांत हवामान कोरडे असले, तरी थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील अनेक भागांत थंडी कमी झाली असून, किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा, जळगाव या भागांत काही प्रमाणात थंडी आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात थंडी कमी झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतील बहुतांशी भागातही थंडी कमी झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात कमी अधिक स्वरूपात थंडी असून, किमान तापमान ११ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.     बुधवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १४.३ (२), अकोला १५.४ (१),  अमरावती १४.६, औरंगाबाद १४.३ (२), बीड १७.० (३), बुलडाणा १६.६ (२), चंद्रपूर १५.०,डहाणू १७.४, गोंदिया ११.५ (-२), जळगाव १४.४ (२), कोल्हापूर १७.६ (२), महाबळेश्वर १४.२ (१), मालेगाव १५.२ (४), मुंबई १६.९, नागपूर ११.७ (२), नांदेड ११.५ (-२), नाशिक १३.४ (३), निफाड १३.२, परभणी १४.५,  पुणे १३.९ (३), रत्नागिरी १९.२, सांगली १६.१ (२), सातारा १४.४ (१), सोलापूर १८.४ (२), वर्धा १४.२ (१), यवतमाळ १७.० (२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com