विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम होत असल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान आहे. बुधवारी (ता. ५) विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामान होते. आज (ता. ६) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत असून, उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. बुधवारी सकाळी निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भासह मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ६) विदर्भातील गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी तर उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.    

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली असली तरी, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाली असून, निफाड येथे तापमान १० अंशांच्या खाली तर धुळे, नाशिक येथे तापमानाचा पारा १० अंशांच्या जवळपास आहे. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. 

मंगळवारी (ता. ४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.० (३), नगर १५.८ (३), धुळे १०.४, जळगाव १२.४ (०), कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्‍वर १४.९ (१), मालेगाव १२.८ (२), नाशिक १०.९ (२), निफाड ८.४, सांगली १७.९ (२), सातारा १५.८ (२), सोलापूर २०.१ (१), अलिबाग १७.५ (०), डहाणू १९.० (१), सांताक्रूझ १५.३ (-२), रत्नागिरी १८.८ (०), औरंगाबाद १६.० (३), परभणी १७.३ (१), नांदेड १४.० (०), उस्मानाबाद १४.० (-२), अकोला १७.० (२), अमरावती १६.४ (१), बुलडाणा १५.६ (०), चंद्रपूर १७.० (१), गोंदिया १५.०(१), नागपूर १७.५(३), वर्धा १७.६ (३), यवतमाळ १८.०(२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com