राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

पुणे ः राज्यात पुन्हा काही अंशी पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः कर्नाटक आणि उत्तर केरळ परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात पुन्हा काही अंशी पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. अधूनमधून ढगाळ हवामान होत आहे. मात्र, पावसाची उघडीप कायम आहे. त्यातच मागील दोन दिवसापासून बंगालच्या उपसागर आणि दक्षिण आंध्रप्रदेश व उत्तर तमिळनाडू परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. दक्षिण छत्तीसगड भागातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर दरम्यान आहे. आसामच्या पूर्व भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहे. गुरूवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पन्हाळा येथे सर्वाधिक ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, मिरज, सांगली, शिराळा, पाटण परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड जिल्हयात पावसाची उघडीप होती. सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

रत्नागिरी येथे ३६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण, मालवण, सावंतवाडी भागातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील जळकोट येथे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ हवामान होते. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिंरोचा तर नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

गुरुवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत, हवामान विभाग) ः कोकण : चिपळूण ३३, लांजा १३, राजापूर १०, रत्नागिरी ३६.९, देवगड १५, दोडामार्ग १३, कुडाळ २३, मालवण ३४, सावंतवाडी २७. मध्य महाराष्ट्र : आजरा ११, चंदगड १७, गगनबावडा १४, हातकणंगले २६, करवीर २७.४, पन्हाळा ४८, शिरोळ ४०, आटपाडी १६, जत १३, मिरज २९.६, सांगली २०.५, शिराळा ३९, वाळवा ११, पाटण ३४. मराठवाडा : जळकोट २५. विदर्भ : अहेरी १८.६, सिरोंचा १०.८, मौदा १२.८, रामटेक १३.७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com