नगर, पुण्यातील नऊ गावांत ‘हवामान स्मार्ट गाव’ उपक्रम

जागतिक हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांनी यावर कशी मात करावी, काय उपाययोजना राबवाव्यात, पाण्याचे नियोजन कसे करावे यांसह विविध बाबींचा सल्ला या उपक्रमातून दिला जाणार आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. - डॉ. एम. जी. शिंदे, सहप्रकल्प समन्वयक, हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः सातत्याने बदलत असलेल्या हवामानाची माहिती मिळून शेतकऱ्यांना त्यानुसार शेतीसह अन्य नियोजन करता यावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे नगर जिल्ह्यातील आठ व पुणे जिल्ह्यातील एक अशा नऊ गावांत हवामान स्मार्ट गाव उपक्रम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ही गावे आहेत. उपक्रमांतर्गत या गावांत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जात आहेत. शेतकऱ्यांना हवामानानुसार सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार असून, गावांत शेतकऱ्यांनी शेतीबरोबर पूरक व्यवसाय करावा यावरही भर राहणार आहे. सेवाभावी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी राबवला जाणार आहे.

जागतिक हवामानबदलाचे परिणाम अलीकडच्या काही वर्षांपासून दिसून लागले आहेत. हवामानबदल आता लोकांनाही स्वीकारावा लागणार आहे. हवामानबदलाचे गंभीर परिणाम शेतीवर होत आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाचा पिकांना फटका बसत असून, सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत. आता हवामान बदलानुसारच शेती करावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना सल्ला मिळावा यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन विभागामार्फत यंदा पहिल्या टप्प्यात नगर तालुयाक्यातील बाबुर्डी घुमट, अकोले तालुक्यातील टिटवी, गोंदणी, मान्हेरे, पिंपरकणे, लाडलगाव, शेणित, आंबेगव्हाण व जुन्‍नर (जि. पुणे) तालुक्यातील बुचकेवाडी अशा नऊ गावांत हवामान स्मार्ट गाव उपक्रम राबवला जाणार आहे. अकोल्यात जास्ती पाऊस पडणारी तर नगरमधील कमी पाऊस पडणारी गावे आहेत.

बाबुर्डी घूमट (ता. नगर) येथे हवामान स्मार्ट गावाचे उद्‍घाटन कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार संचालक डॉ. हरि मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, सरपंच जनार्धन माने, उमेश लगड, शांताराम खंडागळे, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. एम. जी. शिंदे, अरुण देशमुख, अमोल धाडगे, महाऊर्जाचे अप्पासाहेब ठाणगे, अविनाश साब्रे, संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे, डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. स्नेहल काकडे उपस्थित होते.

स्मार्ट हवामान गाव योजनेत विद्यापीठाकडे असलेल्या सर्व अत्याधूनिक सुविधांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. निवड केलेल्यांसह परिसरातील गावच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय कसे उभे राहतील यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com