लातूर जिल्ह्यातील खत घोटाळा प्रकरणी सोळा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

लातूरः जिल्ह्यात १६ विक्रेत्यांनी केवळ २४ जणांना ७१९८ पोते खत विक्री करून घोटाळा केल्याचे समोर आले होते. याबाबतचे वृत्त मंगळवारी (ता. १) ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरियाची विक्री करणाऱ्या या सोळा कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूरः जिल्ह्यात १६ विक्रेत्यांनी केवळ २४ जणांना ७१९८ पोते खत विक्री करून घोटाळा केल्याचे समोर आले होते. याबाबतचे वृत्त मंगळवारी (ता. १) ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरियाची विक्री करणाऱ्या या सोळा कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात एका विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित केला आहे. तीन महिन्यांसाठी एकाचा, दोन महिन्यांसाठी दोघांचा, एक महिन्यासाठी अकरा जणांचा तर पंधरा दिवसांसाठी एकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.  टेम्पो चालक, मुनीम, नातेवाइकांच्या नावे खत जिल्ह्यातील टॉप २० युरिया खत खरेदीदारांची तातडीने चौकशी करावी, असे आदेश केंद्र शासनाने राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या युरिया घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पाच उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यात सुनील यादव (लातूर), प्रवीण मेंगशेट्टी (उदगीर), विकास माने (निलंगा), अविनाश कांबळे (औसा रेणापूर), प्रभोदय मुळे (अहमदपूर) या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या चौकशीत खत विक्रेत्यांनी चक्क टेम्पो चालक, मुनीम, नातेवाइकांच्या आधार कार्डाचा वापर करून खत विक्री केल्याचा प्रकार चौकशीत समोर आला आहे.

या खत विक्रीबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करून आपले अहवाल पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर ते अहवाल तातडीने जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे सादर केले गेले. जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडून याची माहिती शासनाला आॅनलाइन देण्यात आली. त्यानंतर लगेच संबंधितांवर कारवाई करावी, असे अहवालासह पत्र जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दहा ते अकरा दिवसांपूर्वीच दिले होते.

या प्रकरणाची चौकशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केली होती. असे असतानाही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुनावणीचे नाटक केले. त्यात दहा ते अकरा दिवस गेले मात्र काहीच कारवाई झाली नाही. १ सप्टेंबरला ‘अॅग्रोवन’मध्ये खत विक्री घोटाळ्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. हे प्रकरण अंगलट येऊ शकते, हे दिसताच तातडीने त्याच दिवशी विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. 

असे झाले परवाने निलंबित ः वांजरवाडा (ता. जळकोट) येथील व्यंकटेश्वरा फर्टिलायझर्सचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे. अहमदपूर येथील राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राचा तीन महिन्यांसाठी,  शिराळा (ता. लातूर) येथील न्यू बालाजी कृषी सेवा केंद्र, किनगावच्या विकास कृषी सेवा केंद्राचा दोन महिन्यांसाठी, लातूरच्या जयराम ट्रेडिंग कंपनी, गणेश कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र,  चिंचोली (ता. निलंगा) येथील आदिती कृषी सेवा केंद्र, निलंगा येथील रामलिंगेश्वर फर्टिलायझर्स, लामजना (ता. औसा) येथील शिवशक्ती कृषी सेवा केंद्र, रेणापूर येथील श्रवणकुमार कृषी सेवा केंद्र, अहमदपूर येथील श्यामसुंदर कृषी सेवा केंद्र, सुंदर कृषी सेवा केंद्र, शिरुर ताजबंद येथील तोंडारे कृषी सेवा केंद्र, जळकोट येथील चैतन्य कृषी सेवा केंद्राचा एक महिन्यासाठी तर जळकोटच्या व्यंकटेश सीडस अॅण्ड फर्टिलायझर्स या दुकानाचा पंधरा दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com