औरंगाबाद, जालन्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे आक्रमण 

११ जूनला केलेल्या पाहणीत मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी आढळून आली. अळीने मोठे नुकसान केल्याचे लक्षात आल्याने फवारणी करतो आहे. मका घेतलेल्या क्षेत्रात आधी आल्याचे पीक घेतले होते. - अंबादास गवळी, माळीवडगाव,ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर आक्रमण केले आहे. दोन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हा प्रादुर्भाव असला, तरी पोषक वातावरणाची निर्मिती झाल्यास अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सातत्याने निरीक्षण करून उपाययोजना करण्याची गरज आहे. 

मराठवाड्यात मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख ७३ हजार ७२२ हेक्टर इतके आहे. या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख १२ हजार ७२१ हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ५८ हजार २२७ हेक्टर, जालना ३६ हजार ६८७ हेक्टर, बीड ६ हजार ४४६ हेक्टर, लातूर ३७८३ हेक्टर, उस्मानाबाद ५६१२ हेक्टर, नांदेड २७८ हेक्टर, परभणी ६७१ हेक्‍टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १११७ हेक्टर मका पिकाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यांत काही ठिकाणी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना तालुक्यांत काही ठिकाणी ही अळी मका पिकावर आक्रमण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मका पिकाची लागवड केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निरीक्षण करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन शिफारशींनुसार उपाययोजना कराव्यात, असे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख  डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com